प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काॅग्रेसशी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे सांगणाऱ्या भाजपने राष्ट्रवादीला समोरा समोर टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काॅग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मातब्बर माजी नगरसेवकांच्या हातात कमळ देत घडयाळाचे काटे उलटे फिरविण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास भाजपच्या एकहाती सत्तेच्या मनसुब्यांना धक्का लागण्याची शक्यता लक्षात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याआधीच शरद पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या हातात कमळ देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे ९७ नगरसेवक निवडून आले होते. यावेळी मोदी लाटेतही एकसंध राष्ट्रवादीने ४४ नगरसेवक निवडून आणले होते. वडगावशेरी, खडकवासला आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले ते उपनगरातील प्राबल्यामुळे. शिवसेनेच्या विभाजनाने दोन्ही शिवसेना कमकुवत झाल्या आहेत तर दुसरीकडे फुटीमुळे राष्ट्रवादीही कमकुवत झाली आहे. त्यानंतरही गेल्या विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी, खडकवासला मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीला चांगले मतदान झाले होते. पुण्यात भाजपने केवळ शिवसेनेशी आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काॅग्रेसची ( अजित पवार) कोंडी झाली होती. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आल्यास भाजपला रोखणे शक्य होते. त्यातच, सोबत महाविकास आघाडीतील उर्वरीत पक्ष सोबत आल्यास भाजपचे १२० जागांचे स्वप्न अडचणीत येणार होते. ही बाब लक्षात आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून वरिष्ठ पातळीवर चर्चाही सुरू झाली होती. दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या आतच भाजपने राजकीय खेळी साधत राशपला वडगावशेरी, खडकवासला मतदारसंघात धक्का देत माजी नगरसेवक पळवले आहेत. त्यामुळे आता येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तरी त्यांची ताकद कमकुवत होणार आहे. दोस्तीत कुस्ती… राज्यात महायुती असल्याने भाजप- शिवसेना, राष्ट्रवादी स्वतंत्र लढले तरी या तिन्ही पक्षांकडून एकमेकांचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांना पक्षात घ्यायचे नाही असा निर्णय झाला होता. त्यामुळे, पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी नगरसेवकांचा प्रवेश भाजपने करून घेतला नाही. मात्र, त्याच वेळी दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली तर राशप पक्षाचे नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, या शक्येतेने भाजपने यांना प्रवेश दिल्याची चर्चा आहे.