प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिका निवडणूक विषयककामासाठी हजर न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली. कोंढवा- येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडील निवडणूकविषयक कर्तव्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता अस्मिता गाडीवडर यांची नियुक्ती केलेली असताना त्या कर्तव्यावर हजर झालेल्या नाहीत. त्यामुळे तात्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर गव्हाड यांनी जारी केले आहेत.निवडणूक कामकाज हे राष्ट्रीय कर्तव्य असून, यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम १४ मधील तरतूद, राज्य निवडणूक आयोगाचे वेळोवेळीचे आदेश विचारात घेऊन विविध कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांच्या सेवा सदर निवडणूकविषयक कामासाठी उपलब्ध करून घेण्यात आलेल्या आहेत. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रीय कार्यालयांकडे निवडणूकविषयक कर्तव्यासाठीचे आदेश बजावण्यात आलेले आहेत. मात्र, काही कर्मचारी हे त्यांना नेमून दिलेल्या कार्यालयांकडे हजर न झाल्याने निवडणूकविषयक कामामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत.गाडीवडर यांची नेमणूक भरारी पथकामध्ये करण्यात आली होती. दि. 25 डिसेंबर 2025 रोजी नेमून दिलेया क्षेत्रात कार्यवाहीसाठी जाणे गरजेचे असताना गाडीवडर या कार्यवाहीसाठी अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे इतर पथकाची तात्पुरती नेमणूक करून त्यांना कार्यवाहीसाठी पाठवावे लागले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे निवडणुकीचे काम पार पाडण्यात अडथळा निर्माण झालेला आहे. यास्तव निवडणूक निर्णय अधिकारी गव्हाड यांनी गाडीवडर यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.