प्रभात वृत्तसेवा पुणे – कर्करोगाचे निदान करणाऱ्या आणि महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या पेट स्कॅन सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (दि. १५) होणार आहे. माजी खासदार दिवंगत गिरीश बापट यांचे नाव या सेंटरला देण्यात येणार आहे. महापालिकेच्या माध्यमातून सुरू होत असलेला देशातील अशा स्वरुपाचा हा पहिलाच प्रकल्प आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे हे महापालिकेत सभागृह नेते असताना त्यांनी या सेंटरची कल्पना सर्वप्रथम मांडली होती आणि त्यासाठी सुरुवातीला आठ कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात केली होती. या सेंटरमध्ये अत्यल्प दरात आवश्यक रुग्णांची पेट स्कॅन चाचणी केली जाणार आहे. पब्लिक-प्रायव्हेट मॉडेलवर हे सेंटर कार्यरत राहणार आहे. पुणे महापालिका आणि एक्स व्हिजन डायग्नॉस्टिक सेंटरच्या माध्यमातून त्याचे संचालन करण्यात येईल.पुणे शहरात काही खासगी रुग्णालयांमध्ये पेट स्कॅन सुविधा उपलब्ध आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही सुविधा नव्हती. शहराची वाढती लोकसंख्या आणि कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी पेट स्कॅनिंगचे असलेले महत्त्व ओळखत घाटे यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी सर्वप्रथम तरतूद केली होती. या सेंटरची उभारणी करण्यासाठी महापालिका तसेच राज्य सरकार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्याचे कामही त्यांनी केले होते.सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथे हे सेंटर उभारण्यात आले आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहरातील पक्षाचे सर्व आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.