प्रभात वृत्तसेवा पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला नागरिकांनी पहिल्या दोन दिवसांतच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या दोन दिवसांत तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक पुस्तकप्रेमींनी महोत्सवाला भेट देऊन पुस्तक खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. परिणामी काही कोटींची उलाढाल झाल्याची माहिती महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली.महोत्सवाचे शनिवारी उद्घाटन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सुमारे ७० हजारांहून अधिक नागरिकांनी गर्दी केली. या विक्रमी गर्दीत युवक-युवतींचा सहभाग लक्षणीय होता. अनेक नागरिकांनी केवळ एक पुस्तक न घेता, एकापेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी करण्याकडे कल दर्शविला. मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध विषयांवरील पुस्तकांच्या दालनांमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होती, ज्यात परदेशी नागरिकांचाही सहभाग दिसून आला.पुणे मध्यभागी असल्याने, पश्चिम महाराष्ट्रातील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये आणि ग्रंथालये मोठ्या संख्येने येथे भेट देत आहेत. या आस्थापनांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी करावी लागते. सवलतीच्या दरात आणि एकाच ठिकाणी नवीन पुस्तके खरेदी करणे त्यांना परवडते. महोत्सवात नव्या पुस्तकांची आणि लेखकांची माहिती मिळण्यासोबतच साहित्यविश्वातील नवे ट्रेंड्स समजत असल्याने, तसेच लेखकांशी थेट संवाद साधता येत असल्याने ग्रंथपालांसाठी हा महोत्सव एक मोठी पर्वणी ठरत आहे. पुस्तकांच्या दालनांना भेटी देण्यासोबतच नागरिकांनी पाल्यांना ‘चिल्ड्रेन कॉर्नर’ची सफर घडवली आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आनंद लुटला. कोणत्या पुस्तकांची विक्री अधिक झाली, कोणत्या विषयांना पसंती मिळाली आणि एकूण उलाढाल याबाबत महोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात सविस्तर माहिती दिली जाईल, अशी माहिती राजेश पांडे यांनी दिली.