प्रभात वृत्तसेवा पुणे – मागील वेळी निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या भाजपला शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयात धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) तीन उमेदवार विजयी झाले, तर भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले. प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले. मात्र, या विजयासाठी भाजपला झुंजावे लागले.प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपच्या निशा मानवतकर सर्वाधिक ३ हजार ९० मतांनी विजयी झाल्या. त्यांना १४ हजार १२९ मते मिळाली. उर्वरित तीनही राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये ऍड. नीलेश निकम सर्वाधिक २ हजार २४० मतांनी विजयी झाले. त्यांना १४ हजार ४२० मते मिळाली. दत्ता बहिरट १ हजार ६४० मतांनी विजयी झाले. त्यांना १४ हजार ७२९ मते मिळाली. अटीतटीच्या लढतीत अंजली विनोद ओरसे यांनी २१६ मतांनी विजय मिळविला. त्यांना १४ हजार ३२७ मते मिळाली. या प्रभागात मतदानाच्या सात फेऱ्या होत्या. सुरुवातीला पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये भाजपचे सर्व उमेदवार आघाडीवर होते. ही आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम होती. मात्र, मताधिक्य घटले होते. शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये चित्र बदलले. राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांनी आघाडी घेत विजय मिळविला. स्थायी समिती माजी अध्यक्ष ऍड. नीलेश निकम आणि माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी अनुभव पणाला लावून हा विजय मिळविला. अंजली ओरसेंसाठी वडील माजी नगरसेवक विनोद ओरस यांचा अनुभव कामाला आला. माजी नगरसेविका रेश्मा अनिल भोसले आणि माजी नगरसेवक आदित्य माळवे यांच्या पत्नी सायली यांना पराभव स्वीकारावा लागला. या प्रभागात लागलेला निकाल भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे.प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले. मात्र, विजयासाठी त्यांना झुंजावे लागले. अमृता म्हेत्रे, अपूर्व खाडे, पूजा पांचाळ-जागडे आणि डॉ. निवेदिता एकबोटे या प्रभागातून विजयी झाले. एका उमेदवाराने मतदान प्रक्रियेसाठी आक्षेप घेतल्याने मतमोजणीस विलंब झाला. येथे लढती अटीतटीच्या झाल्या. तिसऱ्या फेरीअखेर भाजपचे दोन उमेदवार आणि राष्ट्रवादीचे २ दोन उमेदवार आघाडीवर होते. मात्र, पाचव्या फेरीअखेर भाजपचे सर्व उमेदवार आघाडीवर होते. यामध्ये पूजा पांचाळ जागडे या २ हजार ३२२ मतांनी आघाडीवर होत्या, तर उर्वरित तीनही उमेदवार २०० पेक्षा कमी मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे उमेदवारांत धाकधूक होत होती. सहाव्या फेरीअखेर ही आघाडी कायम राखत भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांना पराभव स्वीकारावा लागला.