प्रभात वृत्तसेवा पुणे – शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता पुण्याला अधिक पाण्याची गरज भासणार आहे. यामुळे मुळशी धरणातून शहरासाठी पाणी मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी शहरासाठी देणे शक्य आहे, अशी सकारात्मक भूमिका जलसंपदा विभागाने घेतली आहे. याबाबतचा प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाने शासनाकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली. सध्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा अपुरा पडत आहे. त्यासाठी मुळशी धरणातून वाया जाणारे पाणी बिगर सिंचनासाठी वापरता येईल, असा आग्रह उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी अनेक वर्षांपासून लावून धरला आहे. अखेर या प्रयत्नांना यश आले असून मुळशी धरणातून वाया जाणाऱ्या सात टीएमसी पाण्याचा वापर करण्यास जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्यांनी मान्यता दिली आहे. याचा सविस्तर प्रस्ताव कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे पाठवण्यात आला आहे. कार्यकारी संचालकांनी हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा, अशी विनंती ही यात केली आहे. राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल मान्य करून त्यानंतर सविस्तर अहवाल जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात येणार आहे. मुळशीतील अतिरिक्त पाण्याचा वापर पिण्यासाठी करता येईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ मार्च २०२५ रोजी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वेळोवेळी विभागासोबत बैठका घेऊन १३ ऑगस्ट २०२५ रोजी मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी सिंचन व बिगर सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार हा प्रस्ताव कार्यकारी संचालकांकडे पाठविला आहे. आगामी काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवडची पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळेच टाटांच्या मुळशी, ठोकळवाडी धरणातील पाणी वीजनिर्मितीऐवजी पिण्यासाठी द्यावे. पाण्याऐवजी सौर ऊर्जा आणि अणुऊर्जा यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून वीज तयार करता येईल असा पर्याय उपमुख्यमंत्री पवार यांनी सरकारला सुचविला होता.