प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी (दि. १३) आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पुणे जिल्ह्यातील ४३ हजार १०७ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधून तब्बल २२० कोटी ४७ लाख ७५ हजार ५७१ रुपयांचे तडजोड शूल्क वसुल केले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी (दि. १३) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले होते. लोक अदालतमध्ये प्रलंबित आणि दाखलपूर्व अशा दोन प्रकरची प्रकरणे ठेवण्यात आली होती. प्रलंबित प्रकरणांमध्ये न्यायलयात दाखल असलेल्या प्रकरणांचा समावेश असतो. ही प्रकरणे वेगवेगळ्या कारणास्तव वर्षानुवर्षे सुरूच असतात. अशी सुमारे ५० हजार ७३४ प्रलंबित दावे लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. या दाव्यांमधील ८ हजार ५४ प्रकरणे अदालतीत एका दिवसात निकाली काढण्यात आली. तसेच १ लाख ७२ हजार ८०५ दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली होती. ही प्रकरणे दाखल न करून घेता त्यावर न्यायलयाच्या बाहेर समोरासमोर बोलवून लोक अदालतीमध्ये तोडगा काढण्यात येत होता. या दाखलपूर्व प्रकरणंमधील सुमारे ३५ हजार ५३ प्रकरणे निकाली निघाली काढण्यात आली. अशा दोन प्रकरांमधील एकूण ४३ हजार १०७ प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी दिली.