प्रभात वृत्तसेवा रांजणी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दोन -अडीच वर्षांपूर्वी तालुक्यात पदाधिकाऱ्यांसाठी एक व्यक्ती एक पद हा नियम लागू केला होता. खरे तर वळसे-पाटील यांनी लागू केलेला नियम हा अत्यंत चांगला आणि स्तुत्य आहे. मात्र, तालुक्यात आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही “साहेब ” हाच नियम ठेवणार का ? याकडे तालुक्यातील आम जनतेचे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.सलग आठ वेळा आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व केलेले ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील हे एक शांत, संयमी आणि दूरदृष्टी असणारं नेतृत्व म्हणून सर्वांनाच परिचित आहे. वळसे पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला आणि आजतागायत कार्यकर्त्यांची एकजूट ठेवण्यात ते यशस्वी ठरले. दोन वर्षांपूर्वी आंबेगाव तालुक्यातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना एक व्यक्ती एक पद हा नियम लागू केला होता. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता. बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सन २०२४ साली विधानसभेची निवडणूक झाली आणि झालेल्या निवडणुकीत वळसे पाटील यांना काठावर पास व्हावे लागले. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची घडी त्या निवडणुकीत विस्कटल्याचे देखील काही अंशी पाहायला मिळाले. तद्नंतर दीड वर्षानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या असताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कोणाला उमेदवारी द्यायची आणि कुणाला खाली बसवायचे ही मोठी जबाबदारी अर्थातच नेते म्हणून दिलीप वळसे पाटील आणि त्यांच्या बरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खांद्याला खांदा लावून काम करत असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर निश्चितच आहे. वळसे पाटील यांचे गेल्या ३५-४० वर्षातील राजकारण पाहता संयमाने निर्णय घेणारे आणि योग्य व्यक्तीला पदावर बसवणे हा त्यांचा आतापर्यंतचा इतिहास राहिला आहे. होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीने अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे वळसे पाटील नक्की कुणाला उमेदवारी देणार आणि एक व्यक्ती एक पद हा त्यांनी केलेला नियम ते पाळणार की तोडणार ? याकडे आता सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.