प्रभात वृत्तसेवा पाटस – पाटस जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली असून पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी फिल्डिंग सुरू केली आहे. निवडणुकीच्या रिंगणात आजी, माजी व नवीन उमेदवार गावातील लोकांशी संपर्क साधत आहेत, दौंड तालुक्याचे राजकारण आणि अर्थकारण असलेल्या पाटस-कुरकुंभ गटात सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. पंचायत समितीसाठी पाटस आणि कुरकुंभ गण सर्वसाधारण आरक्षित आहे. आरक्षित गट- गणांसाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे.राज्यातील जिल्हा परिषद निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. दौंड तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात मुख्य लढत पाहण्यास मिळणार आहे. भाजपकडून आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादीकडून माजी आमदार रमेश थोरात यांनी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. दौंड तालुक्यात एकूण जिल्हा परिषद गट सात असून पंचायत समितीसाठी एकूण १४ गण आहेत. पाटस कुरकुंभ जिल्हा परिषदेच्या गटातून पाटस, कुरकुंभ, मळद, पांढरेवाडी, जिरेगाव, कुसेगाव, रोटी, हिंगणीगाडा, रावणगाव, वासुंदे, नंदादेवी, कौठडी व बिरोबावाडी या गावांचा समावेश करण्यात आला आहे. पाटस गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या पाटस गटातून इच्छुक उमेदवारांनी राजकीय वातावरण तापवले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी अनेक इच्छुकांनी बाशिंग बांधून दौरे सुरू केले आहेत. निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या नवीन उमेदवारांमध्ये अनिश्चितेचे वातावरण आहे. अनेक नवीन युवा उमेदवार आतापासूनच तयारीला लागले असून लोकांना नमस्कार, रामराम करीत आहे.गावातील दशक्रिया विधी पूर्ण होईपर्यंत स्वतः हजर राहणे, समोरासमोर कामे करणेही सुरू केले आहे. भेटीगाठी वाढल्या आहेत. आजी- माजी पदाधिकारी उमेदवारीसाठी कोणत्याही पक्षात जाऊ शकते. तोडाफोडीचे समीकरण निवडणुकीत होणार असे दिसत आहे. पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. पक्षाची उमेदवारी मिळाले नाही, तर गट, आघाडी स्थापन करून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक लढण्याची तयारी चालविली आहे. इच्छुकांची सुप्त आकांक्षा बळावली जिल्हा परिषद आणि दौंड पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या थोरात गटाकडून माजी सभापती आशा नितीन शितोळे, ज्योती शिवाजी ढमाले, पूनम सुशील शितोळे, ग्रामपंचायत सदस्य शीतल गणेश चव्हाण हे उमेदवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उडी घेण्यासाठी तयार झाले आहेत. पंचायत समितीच्या पाटस गणातून थोरात गटाकडून पाटस येथील ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील बाळासाहेब भागवत, कुसेगाव येथील सागर बाळासाहेब शितोळे यांनी पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गट- गणांतून प्रबळ नावे चर्चेत कुरकुंभ गटातून पांढरेवाडी येथील स्वप्नील शितोळे, रावणगावचे माजी सरपंच गेणदेव माणिक आटोळे यांनी पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली. भाजपच्या कुल गटाकडून पाटसच्या जिल्हा परिषदेच्या गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य वैशाली वाबळे, प्राची शितोळे, मीनाक्षी देशमुख, सई शितोळे हे उमेदवार इच्छुक आहेत. पाटस पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी पाटस गणातून जयंत पाटील, संभाजी बापू खडके, प्रताप भागवत हे उमेदवार इच्छुक आहेत तर पंचायत समितीच्या कुरकुंभ गणातून राहुल भोसले, राहुल शितोळे, कालिदास ननावरे, बापू भागवत हे उमेदवार इच्छुक आहेत.