प्रभात वृत्तसेवा आळेफाटा – राज्यात एकमेकांविरुद्ध टोकाची भूमिका घेणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी जुन्नर तालुक्यात मात्र एकत्रित निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या हालचालींमुळे प्रस्थापित सत्तासमीकरणे हादरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यात दोन्ही शिवसेना एकत्रित निवडणूक लढवण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ओतूर आणि बारव हे दोन गट उद्धव ठाकरे गटाला देण्याबाबत चर्चा झाली होती, मात्र तिथे सक्षम उमेदवार नसल्याने शिवसेनेच्या एका महिला उमेदवाराला मशाल चिन्हावर उभे करण्याचा पर्याय पुढे आला आहे. दरम्यान, राज्य पातळीवरील नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त करत तालुका स्तरावर असा निर्णय घेतल्यास ‘एबी फॉर्म’ न देण्याचा इशारा दिल्याने ही युती होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिवसेनेप्रमाणेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीला खासदार अमोल कोल्हे आणि माजी आमदार अतुल बेनके यांची उपस्थिती राजकीय बदलाचे संकेत देणारी मानली जात आहे. आमदार शरद सोनवणे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख उपस्थित होते. यात पिंपळवंडी गटातील इच्छुक उमेदवार मंगेश काकडे यांनी धनुष्यबाण चिन्हावर लढावे, तर बोरी गटातून उद्धव ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुखांच्या पत्नीला मशाल चिन्हावर पाठिंबा द्यावा, अशा प्रस्तावाची चर्चा रंगली आहे. जुन्नरमध्ये ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गण आहेत. नगर परिषद निवडणुकीतील अनुभवानंतर अतुल बेनके सतर्क झाले असून, आघाडी न झाल्यास सर्व आठही गटांत स्वतंत्र उमेदवार देण्याची त्यांची तयारी आहे. काही ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरी टाळण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे. अमोल कोल्हे यांचा आग्रह व गुंतागुंत खासदार अमोल कोल्हे यांचा उद्धव ठाकरे गटाला सोबत घेण्याचा आग्रह आहे, तर अजित पवार गटाने कोल्हे यांनी त्यांच्या कोट्यातील जागा शिवसेनेला द्याव्यात अशी भूमिका मांडली आहे. प्रस्तावानुसार ५ जागांवर अजित पवार गट तर उर्वरित ३ जागांवर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट निवडणूक लढवू शकतात. शिवसेना-शिवसेना आणि राष्ट्रवादी-राष्ट्रवादी एकत्र येणार? शिवसेना-शिवसेना आणि राष्ट्रवादी-राष्ट्रवादी युतीच्या या चर्चांमुळे जुन्नर तालुका राज्याच्या राजकारणाची प्रयोगशाळा ठरत आहे. ही युती प्रत्यक्षात आल्यास राज्यात नवे राजकीय मॉडेल समोर येईल, अन्यथा सर्वच पक्षांना ‘एकला चलो रे’ची भूमिका घ्यावी लागण्याची शक्यता आहे.