प्रभात वृत्तसेवा वडापुरी – जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून इच्छुक उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. त्यातच उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे उंबरठे झिजवावे लागणार असून कोणाला कोणत्या पक्षाचे तिकीट मिळेल? व नाराज झालेला वर्ग काय भूमिका घेणार? यावर तालुक्यातील राजकारण अवलंबून असणार आहे. वडापुरी (ता. इंदापूर) पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण महिला राखीव जागेतून भाटनिमगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच मनोहर भोसले यांच्या पत्नी वैशाली भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. मनोहर भोसले हे राजवर्धन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन असून गेल्या २५ वर्षापासून सामाजिक व राजकीय कार्यात सहभागी आहेत. वैशाली भोसलेनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त गावात महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले होते. या कार्यक्रमासाठी श्रीराज भरणे,अनुष्का भरणे व तेजस्विनी भरणे उपस्थित होत्या.मनोहर भोसले यांनी २०१३ सालापर्यंत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत काम केले असून, मागील ११ वर्षापासून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत कार्यरत आहेत. यावेळी वडापुरी गणातून वैशाली भोसले यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारीची मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करणार, असल्याचे भोसले यांनी सांगितले.