प्रभात वृत्तसेवा जुन्नर – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर झाला असून, तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेचे ८ गट आणि पंचायत समितीचे १६ गण असून या निवडणुकीसाठी एकूण ३ लाख ७ हजार २२३ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १ लाख ५५ हजार ८६३ पुरुष आणि १ लाख ५१ हजार ३५५ महिला मतदारांचा समावेश आहे. संपूर्ण तालुक्यात ३६६ मतदान केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील शेळके यांनी दिली आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार, जुन्नर पंचायत समिती सभागृहात शुक्रवार, दि. १६ जानेवारी ते बुधवार, दि. २१ जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत २३ ते २७ जानेवारीपर्यंत असेल. प्रत्यक्ष मतदान ५ फेब्रुवारी रोजी पार पडणार असून ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून लेण्याद्री देवस्थानच्या सभागृहात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १९०० शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशासनाने पोलीस विभागाची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत कडक सूचना दिल्या आहेत. तसेच, सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.