प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – पुणे जिल्हा परिषद आणि शिरूर पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिरूर तालुक्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी आणि धक्कादायक उलथापालथ पाहायला मिळाली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून विविध पक्षांच्या माध्यमातून निवडणुकीची जय्यत तयारी करणाऱ्या अनेक इच्छुकांना ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने तालुक्यात मोठी बंडखोरी आणि पक्षांतरे झाली. अर्ज भरण्यासाठी एका पक्षाचे शक्तीप्रदर्शन करत गेलेले अनेक उमेदवार परतताना दुसऱ्याच पक्षाचा अधिकृत फॉर्म किंवा अपक्ष म्हणून बाहेर पडल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे पार ढवळून निघाली आहेत.या राजकीय नाट्याची सुरुवात राष्ट्रवादीचे माजी आमदार पोपटराव गावडे, माजी सभापती सुनीता गावडे, माजी नगराध्यक्ष मनीषा गावडे आणि माजी संचालक राजेंद्र गावडे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाने झाली. मात्र, प्रत्यक्ष अर्ज भरण्याच्या दिवशी जे चित्र दिसले त्याने राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले आहेत. शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान सदस्य कुसुम मांढरे आणि माजी सभापती मोनिका हरगुडे या दोघीही मोठ्या समर्थकांसह आल्या होत्या. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने कुसुम मांढरे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकवले. तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस गटात तर वेगळेच चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) कडून तयारी करणाऱ्या सारिका करपे या शक्तीप्रदर्शन करत आल्या, पण त्यांनी चक्क शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. याच गटात भाजपच्या दीपाली गव्हाणे आणि रेश्मा शिंदे यांच्यात स्पर्धा असताना रेश्मा शिंदे यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. शिरूर-न्हावरा गटातही अजित पवार गटाकडून इच्छुक असलेल्या तृप्ती सरोदे यांनी ऐनवेळी शिवसेनेकडून अर्ज भरून पक्षाला धक्का दिला.पंचायत समिती गणांमध्येही अशीच स्थिती दिसून आली. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे यांनी राष्ट्रवादीकडून, तर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सागर खंडागळे यांनी चक्क भाजपच्या तिकिटावर अर्ज भरला. राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष राहुल रणदिवे यांनी शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी अर्ज दाखल केला. या सर्वांनी अर्ज भरण्यासाठी येताना मूळ पक्षाचे झेंडे आणले होते, मात्र बाहेर पडताना त्यांच्या हातात दुसऱ्याच पक्षाचे एबी फॉर्म होते. या सर्व घडामोडींमुळे आता अर्जांची छाननी आणि माघारीच्या दिवशी नेमके काय घडते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. प्रचार केला एका चिन्हाचा, मते मागणार दुसऱ्या चिन्हावर… शिरूर तालुक्यातील अनेक इच्छुकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून देवदर्शन सहली, भव्य कार्यक्रम, पोस्टर्स आणि फ्लेक्सच्या माध्यमातून एका विशिष्ट पक्षाच्या चिन्हाचा प्रचार केला होता. आपली निशाणी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मोठी ताकद लावली होती. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी पक्ष बदलल्यामुळे, आता मतदारांसमोर जाताना नवीन चिन्हाचा प्रचार करण्याचे आणि मते मागण्याचे मोठे संकट या उमेदवारांवर आले आहे.