प्रभात वृत्तसेवा आळेफाटा – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात उमेदवारीवरून झालेल्या नाराजी, पक्षांतर आणि बंडखोरीमुळे संपूर्ण राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. आजची परिस्थिती पाहता ‘एकात एक आणि बापात लेक नाही’ ही म्हण अक्षरशः प्रत्ययास येत असून कोण कुणासोबत आणि कुणाविरुद्ध हे ओळखणे मतदारांना कठीण झाले आहे. विविध पक्षांतील अंतर्गत बंडाळीमुळे प्रस्थापित नेत्यांच्या बालेकिल्ल्यांना मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या सुनेला उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर कल्पना संदीपान पवार यांनी बोरी जिल्हा परिषद गटातून थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे यांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज बोरी गटातूनच दाखल केला आहे. तसेच, माजी आमदार अतुल बेनके यांचे खासगी सचिव प्रसाद पानसरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यांच्या पत्नी अक्षदा पानसरे यांना ओतूर गटातून उमेदवारी मिळाली आहे. या निर्णयामुळे जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.बंडखोरीचे हे लोण बारव आणि बेल्हे गणापर्यंत पोहोचले असून अतुल बेनके यांचे समर्थक राजेंद्र पिंगट आणि अजिंक्य घोलप यांनीही राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरले आहेत. आमदार शरद सोनवणे यांचे खंदे समर्थक मयूर पवार यांना डावलून उबाठा गटातून आलेल्या मंगेश काकडे यांना उमेदवारी दिल्याने पवार समर्थक नाराज असून ते राष्ट्रवादीकडे वळण्याची शक्यता आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्र लढणार असून, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी आणि उबाठा गट यांची युती मैदानात आहे. तालुक्यातील या गुंतागुंतीच्या राजकीय स्थितीमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून आयत्या वेळी उमेदवारी मिळालेल्या नवीन चेहऱ्यांना मूळ कार्यकर्ते किती साथ देतात, यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, ही निवडणूक अनेकांसाठी राजकीय अग्निपरीक्षा ठरणार आहे.