प्रभात वृत्तसेवा मंचर – आंबेगाव तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यासाठी बैठका, चर्चा आणि आढावे घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी संपर्क वाढवला असून पक्षांतर्गत चाचपणीला गती आली आहे. या निवडणुकीत आंबेगाव तालुक्यात पंचायत समितीच्या एकूण दहा गणांसाठी तर जिल्हा परिषदेच्या पाच गटांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गण आणि गट महत्त्वाचा ठरणार असून पक्षांकडून जिंकण्याच्या दृष्टीने मजबूत उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे. संभाव्य उमेदवारांची नावे चर्चेत असून स्थानिक समीकरणे, सामाजिक समतोल आणि मागील निवडणुकांचे निकाल लक्षात घेऊन निर्णय घेतले जात आहेत. पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावर बैठका घेऊन उमेदवारीबाबत मतमतांतरे जाणून घेतली जात आहेत. काही पक्षांकडून प्राथमिक यादी तयार करण्यात आली असून अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपर्क अभियान सुरू दरम्यान, निवडणूक मतदान तारीख जवळ आल्याने इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. गाठीभेटी, बैठका आणि विकासकामांचा आढावा देत प्रचाराची तयारी केली जात आहे.पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमुळे आगामी काळात आंबेगाव तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.