प्रभात वृत्तसेवा पौड – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मुळशी तालुक्यात चुरस दिवसेंदिवस वाढत चालली असून बुधवारी, दि. २१ रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ४६ तर पंचायत समितीसाठी तब्बल १०९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक लढत रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक उमेदवारांनी समर्थकांच्या मोठ्या जमावासह शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. मात्र, शेवटच्या दिवशी कोणाला पक्षाचा अधिकृत ए.बी. फॉर्म मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना, भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच स्वराज्य पक्ष यांच्याकडून अधिकृत ए.बी. फॉर्म मिळालेल्या उमेदवारांमध्ये उत्साह दिसून आला. मात्र, ज्यांना ए.बी. फॉर्म मिळाला नाही, त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे सूर उमटताना दिसले. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची पुढील भूमिका काय असेल, ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार की माघार घेणार, याकडे आता संपूर्ण मुळशी तालुक्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद गट मुळशी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी पौड ३४, हिंजवडी ३५ व पिरंगुट ३६, असे तीन गट आहेत. यापैकी पौड ३४ गटातून ११ अर्ज, हिंजवडी ३५ गटातून आतापर्यंत २० अर्ज, तर पिरंगुट ३६ गटातून १५ अर्ज दाखल झाले असून एकूण ४६ अर्जांची नोंद झाली आहे. पंचायत समिती गण साठी पौड ६७ मधून २२, अंबडवेट ६८ मधून २२, माण ६९ मधून १८, हिंजवडी ७० मधून ११, पिरंगुट ७१ मधून १७ तर भुगाव ७२ मधून १९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे पंचायत समितीसाठी एकूण १०९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. निष्ठावंतांची बंडखोरी ? मुळशी तालुक्यात निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संभाव्य बंडखोर उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात उतरतात की पक्षश्रेष्ठी त्यांना रोखण्यात यशस्वी ठरतात, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.