कडूस आणि मेदनकरवाडीत अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद; ७४ जिल्हा परिषद तर १६० पंचायत समिती उमेदवार आता रिंगणात. ZP Election 2026: राजगुरुनगर – खेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी आज (दि.22) पार पडली. या छाननीत जिल्हा परिषद गटातील 3 व पंचायत समिती गणातील 3 असे एकूण 6 उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले. जिल्हा परिषदेसाठी 74 उमेदवारी अर्ज वैध, तर पंचायत समितीसाठी 160 उमेदवारी अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रांत कार्यालय तथा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक तथा पीएमआरडीए सहाय्यक आयुक्त श्रीमती पूनम मेहता, निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत बेडसे उपस्थित होते. छाननीदरम्यान अर्जांवरील हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. छाननी प्रक्रियेदरम्यान उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. हरकतीच्या वेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील व विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी उपस्थिती लावल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. आमदार बाबाजी काळे हे हरकतीच्या ठिकाणी बराच वेळ थांबले होते, त्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चांना उधाण आले. राजगुरुनगर ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीवेळी उपस्थित उमेदवार व कार्यकर्ते. जीवन खराबी यांचा उमेदवारी अर्ज वैध नाणेकरवाडी जिल्हा परिषद गटातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार जीवन खराबी यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गणेश बोत्रे यांचे सूचक मंगेश सातव यांनी आक्षेप नोंदवला होता. खराबी यांच्या शपथपत्रात मालमत्ता नमूद नसल्याचा तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा आक्षेप घेण्यात आला होता. या आक्षेपांवर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर सर्व आक्षेप फेटाळून लावत जीवन खराबी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. अर्ज वैध ठरताच खराबी यांच्या समर्थकांनी परिसरात फटाके फोडून आनंद साजरा केला. शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांनी या निर्णयाला मोठा राजकीय विजय मानले. यांचे उमेदवारी अर्ज बाद जिल्हा परिषद : कडूस गट – अपक्ष उमेदवार सुवर्णा सत्यवान जाधव मेदनकरवाडी गट – अपक्ष उमेदवार सोनल विनोद टोपे नाणेकरवाडी गट – इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार बाळू शिवाजी नाणेकर पंचायत समिती : मरकळ गण – अपक्ष उमेदवार सतीश करू भाडळे नाणेकरवाडी गण – अपक्ष उमेदवार जयश्री बाबाजी शिंदे