प्रभात वृत्तसेवा राजगुरुनगर – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली.या पार्श्वभूमीवर दौंडे यांनी राजगुरुनगर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत बेडसे, नायब तहसीलदार रवींद्र मोरे व चेतन मोरे उपस्थित होते. अनिल दौंडे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी खेड तालुक्यात एकूण 337 मतदान केंद्रे असून, गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांची आदर्श आचारसंहिता प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी एक खिडकी प्रणाली उभारण्यात येणार असून, प्रचार, सभा व कार्यक्रमांसाठी आवश्यक सर्व परवानग्या याच माध्यमातून दिल्या जाणार आहेत.मतमोजणी व निवडणूक साहित्य साठवणुकीसाठी हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षांना आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना सूचक हा त्याच गटातील अथवा गणातील असणे बंधनकारक राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पिंक मतदान केंद्रांची उभारणी, तसेच लोकजागृतीसाठी पथनाट्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. दुबार मतदारांच्या बाबतीत इङज मार्फत संपर्क साधून योग्य मतदान केंद्र निश्चित केले जाणार आहे. केंद्राध्यक्षांना आवश्यक अधिकार देण्यात आले आहेत. फ्लेक्स, प्रचार वाहने व कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले असून, नगर परिषद हद्दीतील परवानगी घेतलेल्या फ्लेक्सवरही कारवाई केली जाणार आहे. नवीन फ्लेक्स लावण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, गाव जत्रांमधील बैलगाडा शर्यती, तमाशा व ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल; मात्र आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन बंधनकारक राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. खर्च मर्यादा निश्चित निवडणूक खर्चावर कडक नियंत्रण ठेवण्यात येणार असून, जिल्हा परिषद : 9 लाख रुपये. पंचायत समिती : 7 लाख रुपये अशी खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून खर्चाची नोंद घेतली जाणार असून, उमेदवारांच्या सर्व हालचालींवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणार्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला.