प्रभात वृत्तसेवा चाकण – चाकण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) नगरसेविका सुवर्णा शाम राक्षे यांची बहुमताने निवड झाली. नगराध्यक्षा मनिषा सुरेश गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष या दोन्ही पदांवर आता महिलांची वर्णी लागली आहे. मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व गटनेते नितीन गोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 3 (अ) च्या नगरसेविका सुवर्णा शाम राक्षे यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी सूचक म्हणून ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश लक्ष्मण गोरे, तर अनुमोदक म्हणून अनिल इंदाराम लोहकरे होते. विरोधी गटाकडून आकाश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा मनिषा गोरे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली. हात वर करून घेतलेल्या मतदानात सौ. सुवर्णा राक्षे यांना 16 मते, तर आकाश जाधव यांना 10 मते मिळाली. त्यानंतर सौ. सुवर्णा शाम राक्षे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. याच सभेत स्वीकृत नगरसेवकपदी शिवसेना चाकण शहरप्रमुख महेश शेवकरी, आझाद हिंद मंडळाचे कार्यकर्ते शशिकांत जाधव, तसेच विरोधी पक्षाकडून विकास धाडगे यांची निवड झाल्याचे नगराध्यक्षा मनिषा गोरे यांनी जाहीर केले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. निवडीनंतर नगराध्यक्षा मनिषा गोरे, गटनेते नितीन गोरे तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुवर्णा राक्षे व स्वीकृत नगरसेवकांचे अभिनंदन केले.या कार्यक्रमास नगरसेवक रणजित जरे, हर्षद लेंडघर, प्रेम जगताप, मंगेश कांडगे, प्रकाश भुजबळ, धीरज मुटके, साहेबराव कड, सागर बनकर, तसेच नगरसेविका जयश्री नायकवाडी, साधना गोरे, रुपाली कांडगे, आरती परदेशी, पुनम शेवकरी, स्वाती लेंडघर, अनिता घोगरे, वर्षा शेवकरी, रेश्मा मुटके, तृप्ती जगनाडे, विजया तोडकर, विजया जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.