शिरूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील बेट भाग सध्या राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू ठरला आहे. इच्छुक उमेदवारांकडून प्रचाराच्या पारंपरिक सभा, भित्तीपत्रके व घोषणांच्या पलिकडे जात सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, मनोरंजन व जेवणावळींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा वेगळा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे बेट भागात सध्या राजकारणापेक्षा कार्यक्रमांचीच अधिक चर्चा रंगताना दिसत आहे. जिल्हा परिषद सदस्य पदासाठी इच्छुक उमेदवार राजेंद्र गावडे यांनी महिलावर्गाला लक्षात घेऊन ‘होम मिनिस्टर’ हा लोकप्रिय कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात घरगुती खेळ, प्रश्नोत्तरे व बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहिली. तर दुसरीकडे जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार दामुशेठ घोडे यांनी ग्रामीण संस्कृतीशी नाते जोडण्यासाठी पारंपरिक जागरण-गोंधळाचे आगळे वेगळे आयोजन केले. देवभक्ती, लोककला व मनोरंजन यांचा संगम साधत त्यांनी मतदारांशी भावनिक नाते निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाला तब्बल तीस ते पस्तीस हजार नागरिकांची उपस्थिती व त्यांच्या भोजनाची व्यवस्था करून त्यांनी विरोधकांना मोठा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार बाळासाहेब डांगे यांनी वेगळा प्रयोग करत चांडाळ-चौकटीचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमातून विनोदी शैलीत सामाजिक विषयांवर भाष्य करण्यात आले. तरुण आणि मध्यमवयीन मतदार या कार्यक्रमाकडे विशेष आकर्षित झाले. अनेक मतदारांनी कोणालाही दुखावू नये म्हणून तिन्ही ठिकाणी उपस्थिती लावत राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसून आले. परिणामी सध्या हुशार मतदार नेमका कोण कुणाच्या बाजूने आहे, हे ओळखणे कठीण बनले आहे. हळूहळू सगळे चित्र स्पष्ट होईल. राजकीय जाणकारांच्या मते ही सारी हालचाल म्हणजे मतदारांचा कल तपासण्याची आणि आपली ताकद मोजण्याची एक अनौपचारिक चाचणी आहे. हुशार मतदार राजा शेवटी विश्वासार्हता, संपर्क व प्रामाणिकपणा पाहूनच निर्णय घेतो, असेही बोलले जात आहे. एकूणच बेट भागात सध्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राजकीय वातावरण तापले असले तरी याचा प्रत्यक्ष परिणाम मतपेटीवर किती होतो, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. आचारसंहिता लागू होईपर्यंत बेट भागात राजकारणाइतकीच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल सुरू राहणार असून त्याचा मतदारांवर किती प्रभाव पडतो हे पाहणे आता महत्त्वाचे आहे.