राजगुरुनगर : खेड तालुक्यातील गुळाणी गावात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले असून गावातील पाझर तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे नागरिक, शेतकरी आणि पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले असून तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गावातील प्रमुख पाणीसाठा असलेला पाझर तलाव आटल्याने पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोतच संपुष्टात आला आहे. सध्या काही विहिरींवरच पाण्याचा तुटपुंजा आधार उरला असला तरी पाण्याची पातळी झपाट्याने घटत आहे. येत्या काही दिवसांत ही सोयही अपुरी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला असून, खासगी टँकरचीही तयारी सुरू आहे. दरम्यान, आज (दि.31) जिल्हा परिषद गटनेते अॅड. विजयसिंह शिंदे, पंचायत समिती सभापती विद्याताई मोहिते, सदस्य माऊली ढेरंगे, संचालक सयाजी मोहिते यांनी तलावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गुळाणी हे पठारावरील गाव असल्याने पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही पाण्याचे दीर्घकालीन साठवण होत नाही. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात टंचाई निर्माण होते. यंदा मात्र परिस्थिती अधिक गंभीर झाली असून गावातील पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. पाणीटंचाईचा फटका पशुधनालाही बसत आहे. जनावरांना पाणी व चार्याची कमतरता भासत असून शेतकर्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. काही ठिकाणी दूरवरून पाणी आणण्याची वेळ आली आहे. गुळाणी व परिसरातील गावांसाठी टँकर हा तात्पुरता उपाय असला तरी जलसंधारण, तलावांची क्षमता वाढवणे आणि कळमोडीसारखे प्रकल्प पूर्ण करणे हेच दीर्घकालीन समाधान असल्याचे स्पष्ट होत आहे. अन्यथा दरवर्षी उन्हाळ्यात गावकर्यांना अशाच भीषण संकटाचा सामना करावा लागणार आहे. दीर्घकालीन उपायांची गरज खेड तालुक्यातील वाफगाव, गुळाणी, वरुडे, वाकळवाडी, गोसासी, जरेवाडी, जैदवाडी, कनेरसर, पूर ही गावे पारंपरिकरित्या अवर्षणग्रस्त मानली जातात. जलसंधारणाच्या अपुर्या उपाययोजनांमुळे दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्या पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू असून त्यामुळे साठवण क्षमता वाढेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, केवळ गाळ काढणे पुरेसे नसून व्यापक जलसंधारण योजना राबवण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कळमोडी धरण प्रकल्प मार्गी लागल्यास खेडच्या पूर्व भागातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. हा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे. गुळाणी गावातील पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी तातडीने पाणीपुरवठा सुरू करणे गरजेचे आहे. कळमोडी प्रकल्प पूर्ण झाल्यास कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो. – माऊली ढेरंगे, सदस्य, खेड पंचायत समिती जिल्हा परिषद व सेझ परिसरातील कंपन्यांच्या सीएसआर निधीतून पाझर तलावाचे खोलीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे साठवण क्षमता वाढून भविष्यातील टंचाई कमी होण्यास मदत होईल. – अॅड. विजयसिंह शिंदे, गटनेते, जिल्हा परिषद