प्रभात वृत्तसेवा रांजणी( रमेश जाधव ) – आंबेगाव तालुक्यात कार्तिकी एकादशीनंतर लगीनसराईला उधाण आले आहे. विवाह सोहळ्यात पै, पाहुण्यांपेक्षा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली आहे. तुळशीविवाहानंतर सुरू झालेल्या लग्नसराईमुळे मंगल कार्यालय मालक, पौरोहित्य करणारे, पारंपारिक वाद्यवृंद, केटरिंग व्यवसायिक आणि घोडे बिछायत मालकांची जोरदार चलती सध्या सुरू आहे. हा व्यवसाय तेजीत असला तरी या लग्नांमध्ये खऱ्या अर्थाने वऱ्हाडी मंडळी ठराविकच दिसतात. मात्र, विविध राजकिय पक्षांचे कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांची रेलचेल सुरू असल्याचे प्रकर्षाने जाणवते.सध्या लग्नाच्या उपलब्ध तारखा मिळणं अवघड झाले आहे. अनेक ठिकाणी मंगल कार्यालयांचे फुल बुकिंग असून त्यांच्या रिकाम्या तारखांनुसारच विवाह तारीख ठरविण्याची वेळ नववधू वर पक्षांवर येत आहे. त्यातच नगरपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे जनसंपर्क वाढवण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच स्वयंघोषित पुढारी होणाऱ्या विवाह सोहळ्यात ठाण मांडून बसताना दिसत आहेत. त्यामुळे माईक हातात घेऊन स्वागत करणाऱ्यांची मात्र दमछाक होताना दिसते. जसजशी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची तारीख जवळ येऊ लागली आहे. तस – तशी पुढार्यांची लग्न सोहळ्यातील संख्या देखील वाढत असल्याचे एकूणच लग्न सोहळ्यात जमणाऱ्या पुढार्यांच्या उपस्थितीवरून दिसते. सध्या लग्न सोहळ्याचा हंगाम सुरू असल्याने इश्चुक उमेदवारांना जणू काही मतदार आयते जमल्याची पर्वणीच मिळाल्याचे दिसून येते. तालुक्यात सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा मोठ्या प्रमाणात फिवर वाढला आहे. निवडणुकीसाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून उभे असल्याने कधीकाळी कोणाच्या कार्यक्रमाला न जाणारे इच्छुक देखील आता लग्न सोहळ्यात उपस्थित असल्याचे दिसून येते. एका दिवसात अनेक सोहळ्यांना उपस्थिती दरम्यान पाहुण्यांना एका दिवसात अनेक लग्नांचे निमंत्रण असल्यामुळे ते सकाळपासूनच मंगल कार्यालयात हजेरी लावून निघून जातात. लग्न सोहळा सुरू झाला की दोन मिनिटात नमस्कार करून बाहेर पडतात. अशा प्रकारामुळे नवरा – नवरीपासून मामांपर्यंत सगळ्यांनाच पुढार्यांमुळे ताटकळत बसावे लागते. निवडणुकीच्या धामधुमीत लग्नसोहळे देखील राजकीय रंग घेत असल्याचे विश्लेषकांकडून सांगितले जात आहे. पाहुण्यांपेक्षा कार्यकर्त्यांची अधिक उपस्थिती हा आंबेगाव तालुक्यातील सध्या चर्चेचा मुख्य विषय बनला आहे.