प्रभात वृत्तसेवा वाल्हे – यावर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस समाधानकारक पडला होता. यानंतर, मागील महिन्यांपासून डोंगर परिसरातील नैसर्गिक जलस्त्रोत आटले आहेत. वाल्हे (ता.पुरंदर) परिसरातील कृत्रिम पाणवठे, बोअरवेल व टॅंकरने भरण्यात येत असून,या माध्यमातून वन्यजीवांची तहान भागवली जात आहे. दिवसेंदिवस वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणचे नैसर्गिक पाठवठे आटून गेल्यामुळे, वन्यप्राणी पिण्याच्या पाण्याची शोधात मानवी वस्तीमध्ये,मागील काही दिवसांपासून दिसू लागले होते. वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणचे नैसर्गिक पाठवठे आटले असून,अनेक ठिकाणी तयार केलेले कृत्रिम पाणवठ्यात पाणी भरून ठेवणे गरजेचे असल्याने वन विभागाकडून हे कृत्रिम पाणवठे भरण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. वाल्हे येथील भवानीमाता मंदिर परिसरातील डोंगर परिसरामधील वनक्षेत्रात विविध जातींचे अनेक पक्षी व वन्यजीवांसह चिंकारा जातीच्या हरणांची संख्या मोठी आहे. भवानीमाता डोंगर परिसरात सहा कृत्रिम पाणवठे असून,या पाणवठ्यांमध्ये वनविभागाच्या वतीने, सद्यःस्थितीत बोअरवेल साहाय्याने,पाणी सोडण्यात येत आल्याने ते वन्यजीवांना वरदान ठरले आहेत. मात्र,उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. चारा व पाण्यासाठी आजूबाजूच्या शेतात दिवसाही हरणांचे कळप निदर्शनास येत आहेत. या डोंगर परिसरात असलेले लांडगे,चारा-पाण्याच्या शोधात,मानवी वस्तीकडे येत असून,अनेक वेळा शेळ्या-मेंढ्याच्या कळपावर तसेच घरासमोर,गोठ्यातील शेळी- मेंढ्यावर हल्ला करीत होते. अन्न पाण्यासाठी पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग व पुणे-मिरज रेल्वे मार्गओलांडून ये-जा करताना वन्यजीवांचे अपघात झाल्याच्या अनेक घटना मागील काही वर्षांत घडल्या आहेत. यामध्ये अनेक वन्यप्राण्यांना जीव गमवावा लागला आहे. वनविभागाच्या माध्यमातून कृत्रिम पाणवठ्यात पाण्याची सोय करण्यात आली असली तरी वाढत्या उष्णतेने चारा उपलब्ध नसल्याने वन्यजीव मानवी वस्तीत,शेतातील पिकांत फिरू लागले आहेत. “वाल्हे व परिसरातील डोंगर भागातील नैसर्गिक जलस्त्रोत सर्व आटले असून,सध्या दिवसेंदिवस उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, या पार्श्वभूमीवर वन्यजीवांसाठी पाण्याची गरज लक्षात घेऊन,वाल्हे (ता.पुरंदर) येथील भवानीमाता डोंगर परिसरामधील सहा कृत्रिम पाणवठे,राख येथील एक कृत्रिम पाणवठा असून,वनविभागाच्या वतीने,या पाणवठ्यामध्ये बोअरवेल व टँकरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात येत आहे.” – अशोक फडतरे, वनरक्षक, वाल्हे