प्रभात वृत्तसेवा वाघोली – निसर्ग व भूगर्भातील होत असलेल्या बदलांमुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम झाले आहे. निसर्गाबाबत पुनर्विचार झाला पाहिजे.निसर्गाचे आपणच शत्रू आहोत. असे मत डॉॅ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज संभाजीनगर निवृत्त प्राचार्य डॉ. दत्ता देशकर यांनी स्तंभलेखक विठ्ठल वळसे पाटील लिखित निसर्ग दाता पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले. बकोरी देवराई वनराई वृक्ष प्रकल्प व सेवा समर्पण सोशल फाउंडेशन वतीने बकोरी वनराई प्रकल्पामध्ये निसर्ग दाता या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती सेवा समिती राज्याध्यक्ष चंद्रकांत वारघडे होते. देशकर म्हणाले की, नैसर्गिक जलस्त्रोत प्रदुषित घटकांमुळे जैवविविधतेचा र्हास होत आहे तो रोखण्यासाठी प्रत्येकाला जलसाक्षर होणे काळाची गरज आहे. विठ्ठल वळसे पाटील यांनी निसर्ग दाता या वैचारिक ग्रंथातून निसर्गाची विविधता साधली आहे, हे पुस्तक पर्यावरण अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. यावेळी प्रमुख पाहुणे सचिन लोखंडे विस्तार अधिकारी भोर, संत व समाज सुधारक विचार केंद्राचे संस्थापक उत्तमराव भोंडवे, मातृरक्षा प्रकाशन संस्थेच्या प्रकाशिका स्वाती इंगळे, शिक्रापूरचे माजी उपसरपंच व लेखक मयूर करंजे पाटील, चंद्रकांत वारघडे, पत्रकार दिपक नायक यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात वनराई मध्ये वृक्षरोपणाने करण्यात आली. प्रकाशनाची पहिली प्रत ज्येष्ठ पत्रकार स्व. के. डी. गव्हाणे यांची कन्या श्वेता गव्हाणे, मुलगा अभिजीत गव्हाणे, भाऊ विनोद गव्हाणे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. पत्रकारीतेचे धडे घेतले ते स्व. शिवसेना नेते अॅड. अविनाश रहाणे व ज्येष्ठ पत्रकार स्व. के. डी. गव्हाणे यांना अर्पण केल्याचे स्तंभलेखक विठ्ठल वळसे पाटील यांनी सांगितल. यावेळी ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले, जितेंद्र आव्हाळे, विजय लोखंडे, गजानन गव्हाणे, पाठयपुस्तकातील कवी सचिन बेंडभर, अ. भा. परिषदेचे शिरुर अध्यक्ष राहुल चातुर, प्रा. कुंडलिक कदम, तसेच निसर्ग संस्थांचे विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक पत्रकार गणेश सातव यांनी तर, विठ्ठल वळसे पाटील यांनी आभार मानले.