वाघोली : दशक्रिया विधीसाठी पहाटे घराबाहेर पडलेल्या महिलेवर अष्टापूर परिसरात मंगळवारी (दि. ९ डिसेंबर) पहाटे बिबट्याने अचानक हल्ला केला. यात अंजना वाल्मिक कोतवाल या महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर वाघोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचार-पाचच्या सुमारास अंजना कोतवाल या दशक्रिया विधीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याच्या नखे व दातांच्या मार्याने त्यांच्या डोक्याला, मानेला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या. त्या मोठ्याने ओरडल्याने बिबट्या जंगलाकडे पळाला, तर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन अंजना यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, धोका टळला आहे.या घटनेनंतर अष्टापूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पिंजरा लावणे व बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.सध्या वाघोली-लोणीकंद परिसरात बिबट्याच्या वावराच्या तक्रारी वाढल्या असून, नागरिकांनी पहाटे किंवा संध्याकाळी एकटे बाहेर पडू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.