प्रभात वृत्तसेवा वाघोली – आम्ही कोणावरही विनाकारण टीका करीत नाही. मात्र जाणीवपूर्वक, हेतूपुरस्सर टीका करणार्यांना सोडणार नाही, असा ठाम इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी दिला. पुणे महानगरपालिकेच्या लोहगाव, विमाननगर, सोमनाथनगर व वाघोली प्रभाग क्रमांक 3 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या प्रचाराची सुरुवात लोहगाव येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर वाघोली येथील ग्रामदैवत वाघेश्वर महाराजांचेही दर्शन उमेदवारांनी घेतले. संत तुकाराम महाराज व वाघेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होत उपस्थित उमेदवारांनी हजारो नागरिक व कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी बळ मिळावे, अशी प्रार्थना केली. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रामदास दत्तात्रेय दाभाडे, अनिल दिलीप सातव, ऐश्वर्या सुरेंद्र पठारे व श्रेयस प्रीतम खांदवे यांनी संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन नारळ फोडत प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला. संत तुकाराम महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जनसेवा, पारदर्शक कारभार आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास एकजुटीने करण्याचा निर्धार उमेदवारांनी यावेळी व्यक्त केला. नागरिकांचा विश्वास हाच भाजपचा खरा विजयाचा आधार आहे, असे सांगत उमेदवारांनी मतदारांचे आशीर्वाद घेतले. या वेळी भारतीय जनता पार्टीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. लोहगाव परिसरात भाजपच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसून आला.पुणे महानगरपालिकेत समावेश होण्यापूर्वी व नंतर वाघोलीतील विविध विकासकामांसाठी रामभाऊ दाभाडे व अनिल सातव यांनी सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला होता. त्याच धर्तीवर लोहगाव, सोमनाथनगर व विमाननगर परिसरातही ऐश्वर्या पठारे, सुरेंद्र पठारे, प्रीतम खांदवे, श्रेयस खांदवे, रामभाऊ दाभाडे व अनिल सातव यांच्या माध्यमातून स्वखर्चाने तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा करून अनेक विकासकामे मार्गी लागल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. या प्रभागात भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरले असून, आगामी काळात ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. “आम्ही यापूर्वीही विकासकामे करून दाखवली आहेत आणि यापुढील काळात लोहगाव, विमाननगर, सोमनाथनगर व वाघोली परिसराचा विकास अधिक वेगाने करण्यात येईल. नागरिकांनी केलेल्या अपेक्षा पूर्ण करणे हेच आमचे ध्येय आहे. टीका करण्याऐवजी संवाद साधावा, असे माझे आवाहन आहे. मात्र विनाकारण टीका करणार्यांना योग्य उत्तर दिले जाईल.” – रामभाऊ दाभाडे, भाजप उमेदवार प्रभाग क्र. 3