प्रभात वृत्तसेवा वाघोली – पुणे महानगरपालिकेत वाघोलीचा समावेश झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळवून वाघोलीच्या पहिल्या नगरसेवकांचा बहुमान रामदास दत्तात्रय दाभाडे, अनिल दिलीप सातव, रत्नमाला संदीप सातव यांनी मिळवला आहे.भाजप, आरपीआय मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार रामदास दाभाडे, अनिल दिलीप सातव यांनी प्रभाग क्रमांक तीनमध्ये दहा हजाराच्या पुढे मताधिक्य मिळवून विजय संपादन केला आहे. तर प्रभाग क्रमांक चारमध्ये रत्नमाला संदीप सातव यांनी पुणे शहरातील सर्वात जास्त मते मिळवून महिलांमध्ये जास्त मताधिक्य मिळवण्याचा बहुमान मिळवला आहे. प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चारमध्ये वाघोलीची मतदार संख्या विभागली जाऊन दोन प्रभागांच्या मानाने कमी असताना देखील प्रचंड मताधिक्याने विजय संपादन केल्यामुळे भाजपच्या उमेदवारांच्या वाघोलीत मोठ्या प्रमाणात बोलबाला होऊ लागला आहे. पुणे महानगरपालिकेत समाविष्ठ झालेल्या गावांमधून दोन मतदारसंघांना जोडलेला भाग असताना देखील वाघोलीचे तीन नगरसेवक पुणे महानगरपालिकेत नागरिकांचे प्रतिनिधित्व करणार असल्याने वाघोली चे महत्व पुणे मनपात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यात सर्वाधिक मतदानाचा बहुमान पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत रत्नमाला संदीप सातव यांनी ४१ हजार पाचशेंच्या पुढे मतदान मिळवण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी पंचायत समिती हवेलीच्या माजी सभापती तसेच माजी सरपंच वसुंधरा शिवदास उबाळे यांचा पराभव केला आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना संदीप सातव यांच्या कुटुंबीयांनी मिळवलेले यश सध्या वाघोलीत चर्चेत आले आहे. अनुभवी व तरुण नगरसेवकांना पाठिंबा वाघोलीमधील पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांवर काम केले असून या निवडणुकीत जवळपास 25 वर्षे राजकीय अनुभव असणारे व्यक्तीला नागरिकांनी साथ दिली आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज बंडू खांदवे यांचा दाभाडे यांनी पराभव केल्याने वडगावशेरी मतदारसंघात दाभाडे यांचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेला आले आहे. वाघोलीमध्ये भाजपचा प्रचार व प्रसार अखंडपणे करणाऱ्या अनिल दिलीप सातव या तरुण उमेदवाराकडे विकासाचे नवे पाऊल म्हणून वाघोलीकरांनी या उमेदवारला साथ दिली आहे. त्यांनी सुनील खांदवे यांचा पराभव केला आहे. “वाघोली, लोहगाव, खराडी, विमान नगर, सोमनाथ नगर आदी परिसराचा विकास करण्यासाठी पुणे महानगरपालिकेत दोन्ही मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी मताच्या रूपाने साथ देऊन वाघोली मधील तीन नगरसेवकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. आठ ही नगरसेवकांच्या साथीने दोन्ही प्रभागातील विकासाचा आलेख उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहू. वाघोलीबरोबरच इतर भागाचा विकास देखील झपाट्याने होणार आहे.” – डॉ. जयश्री राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच, वाघोली.