प्रभात वृत्तससेवा वाघोली – घरगुती सोलर लाइट व कृषी सोलर पंप बसवून देण्याचे आमिष दाखवून जुन्नर येथील एका व्यक्तीने पिंपरी सांडस परिसरातील शेतकर्यांना तब्बल 8 लाख 27 हजार 200 रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी दत्तात्रय भोरडे (रा. पिंपरीसांडस) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र माधव बोर्हाडे (रा. आळेफाटा, ता. जुन्नर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विजेच्या अडचणीमुळे पिंपरी सांडस येथील शेतकर्यांनी घरात सोलर लाईट व शेतात सोलर पंप लावण्याचे ठरविल्यानंतर जुन्नर येथील राजेंद्र बोर्हाडे यांना बोलाविले. शेतकर्यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये सोलर बसविण्यासाठी बोर्हाडे यांना कॅश, ऑनलाईन स्वरूपात पैसे दिल्यानंतर दोन महिन्यात सोलर बसविण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र डिसेंबर 2024 पासून वारंवार मागणी करूनही टाळाटाळ केली जात असल्याने शेतकर्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. दत्तात्रय भोरडे यांची 1 लाख 40 हजार 700 रुपयांची तर तानाजी हरपळे, संतोष भालेराव, सचिन रायकर, सागर भोरडे यांची 6 लाख 86 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.