प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे फाटा येथे एक जानेवारी २०२६ रोजी होणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शासकीय यंत्रणानी सर्व संघटनांना विश्वासात घेवून यशस्वी करावा आणि कार्यक्रमास येणाऱ्या अनुयायींची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. एक जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित होणाऱ्या करण्यात आली होती. याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पुणे शहर पोलीस उपायुक्त्त सोमय मुंढे, पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, हिम्मत जाधव, समाज कल्याण उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त तथा बार्टीचे निबंधक विशाल लोंढे यांसह अधिकारी व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. विजस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना पिण्याचे व वापराचे पाणी, स्वच्छतागृह, वाहनतळ, दिशादर्शक फलके, वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, औषधोपचार, ड्रोन, सीसीटीव्ही, पुस्तकालय आदी सुविधा उपलब्ध करून देणार असून अनुयायींची कोणतीही गैरसोय होणार नाही याची जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या सूचनांचा नियोजनात समावेश करण्यात येईल.आरोग्याच्या प्रश्नासंबंधी आरोग्य विभागाने नियोजन करावे, पाणी पुरवठ्यासाठी पर्यवेक्षकाची नेमणूक करावी, गरोदर महिला, लहान मुले व वयोवृद्ध महिलांसाठी स्वतंत्र रांगेचे प्रशासनाने नियोजन करावे, विजयस्तंभ नियोजन आराखडाचा अभ्यास करुन तफावत असल्यास सुधारणा कराव्यात, यासह विविध सुचना केल्या. बैठकीत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी उपयुक्त सूचना मांडल्या असून त्या सूचनांचा आदर ठेऊन अंमलबजावणी केली जाईल तसेच संघटनांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता सहकार्य करावे. -जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी.