प्रभात वृत्तसेवा थेऊर – येथील थेऊर – कोलवडी रस्त्यावर ट्रकने 9 दुचाकींना धडक दिल्याने दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) येथील स्मशानभूमीजवळ बुधवारी (दि. 26 ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम संतराम वरपे (वय 25, रा. कोरडेवाडी, पोस्ट विदा, जिल्हा बिड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी अजय मनोहर पवार (वय 33, रा. पाण्याच्या टाकी शेजारी थेऊर ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय पवार हे थेऊर येथील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. पवार यांनी थेऊर स्मशानभुमीच्या बाहेर थेऊर ते कोलवडी रस्त्याच्या कडेला दुचाकी पार्क केली होती. तसेच गावातील इतर नागरीकांनीही त्या ठिकाणी मोटार सायकली पार्क केल्या होत्या. तेवढ्यात स्मशान भूमीच्या बाहेर रोडवर जोरात गाड्या धडकल्याचा आवाज आला. त्यावेळी सर्वजण पळत स्मशानभुमीच्या बाहेर आले. तेव्हा कोलवडीकडून थेऊरकडे जाणाऱ्या मोठ्या ट्रकने दुचाकींना जोराची धडक दिली होती. दरम्यान, या अपघातात विजय पवार, विकास आण्णासो व्यवहारे व इतर 5 ते 6 जणांच्या मोटार सायकलींचा चक्काचूर झाला होता. ट्रकचालक श्रीराम वरपे याने त्याच्या ताब्यातील ट्रक हा वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन, ट्रक भरधाव वेगाने चालवून तसेच इतरांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने वाहन चालवून 9 मोटार सायकलींना धडक देऊन या अपघातास व वाहनांच्या नुकसाणीस कारणीभूत ठरला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ट्रकचालक श्रीराम वरपे याच्यावर भारतीय न्याय संहिता 281,324 (4),324 (5) व मोटार वाहन अधिनियम 184,119 व 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बारगजे करीत आहेत.