प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रविवारी (दि. 30) रोजी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती तथा पुणे जिल्हा पालक न्यायमूर्ती रेवती मोहिते -डेरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राजगुरूनगर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. वैभव कर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.राजगुरुनगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची नवीन 7 मजली सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. तिचे उदघाटन मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती तथा पुणे जिल्हा पालक न्यायमूर्ती रेवती मोहिते – डेरे यांच्या हस्ते रविवारी (दि. 30) सकाळी अकरा वाजता होणार आहे. यावेळी उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर, प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन, राजगुरुनगर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपाध्यक्ष अॅड. शंकर कोबल, अॅड. स्वरूपा कोतवाल, सचिव अॅड. नवनाथ कड, अॅड. अरुण मुळूक, अॅड. विलास काळे, अॅड. संजय गोपाळे, अॅड. दीपक चौधरी, अॅड. साक्षी राक्षे, अॅड. केदार गुरव, अॅड. संकेत वाघमारे, अॅड. माणिक वायाळ, अॅड. अतीक सय्यद, अॅड. संदीप कोळेकर, अॅड. ऋषिकेश पिंगळे, अॅड. ऋषिकेश शिंदे आदी उपस्थित होते. “राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे उदघाटनासाठी उपस्थित राहावे यासाठी यापूर्वी भेट घेतली होती. मात्र नगरपरिषद निवडणूक आचारसंहिता असल्याने ते उपस्थित राहणार नाहीत तसे त्यांनी कळवले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड उपस्थित राहणार नाहीत तसे त्यांनीही कळवले आहे. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती हे उपस्थित राहणार आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व वकील, पक्षकार आणि नागरिकांनी या उदघाटन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे राजगुरुनगर वकील बार असोसिएशनच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.” – अॅड. वैभव कर्पे, अध्यक्ष राजगुरूनगर वकील बार असोसिएशन पक्षकारासाठी नवीन इमारत फायद्याची जुन्या न्यायालयाच्या इमारतीत 10 कोर्ट आहेत. ही जागा अपूर्ण पडत होती. यासाठी राजगुरूनगर बार असोसिएशन आणि तत्कालीन आमदार यांनी पाठपुरावा केला. राज्य सरकारने नव्याने दुसरी 7 मजली इमारत मंजूर केली होती. ती आता बांधून पूर्ण झाली आहे. या इमारतीत 10 कोर्ट हॉल असून 10 न्यायाधीश न्यायदान करणार आहेत. ’पोस्को’ साठी या इमारतीत विशेष न्यायालय करण्यात आले आहे. या इमारतीत लिप्टसह हिरकणी कक्ष, वायफाय, पाणी, सीसीटीव्ही आदी सेवा सुविधा वकील व पक्षकार यांना देण्यात येणार आहेत. पार्किंगसाठी लवकरच जागा उपलब्ध करून व्यवस्था केली जाणार आहे. वाढते खटले आणि त्यासाठी कोर्टात येणार्या पक्षकारासाठी नवीन इमारत फायद्याची ठरणार आहे.