शिरूर: एसटी महामंडळाच्या मनमानी कारभाराचा फटका बसणाऱ्या ग्रामीण प्रवाशांना ग्राहक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. पूर्वसूचना न देता बसफेऱ्या रद्द करणाऱ्या शिरूर आगाराला पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला असून, एका विद्यार्थ्याला १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सविंदणे येथील विद्यार्थी सागर तान्हाजी रोकडे हे टायपिंग क्लाससाठी शिरूर आगाराच्या बसने नियमित प्रवास करत होते. त्यासाठी त्यांनी ५,४०० रुपयांचा विद्यार्थी पास काढला होता. मात्र, शिरूर–लोणी आणि शिरूर–पहाडदरा मार्गावरील बसेस वेळेवर न येणे किंवा अर्ध्या वाटेतून परत फिरवणे, असे प्रकार वारंवार घडत होते. यामुळे सागरचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान झाले. एसटी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्याने त्याने ग्राहक आयोगाचे दार ठोठावले. एसटी महामंडळाने ‘प्रवाशांची संख्या कमी असल्याने फेऱ्या रद्द केल्या’ असा बचाव केला. मात्र, आयोगाने हा युक्तिवाद फेटाळून लावत स्पष्ट केले की, “पासचे पैसे स्वीकारल्यानंतर नियोजित सेवा देणे ही महामंडळाची कायदेशीर जबाबदारी आहे. केवळ नफ्याचा विचार करून सेवा नाकारणे हा ‘सेवा दोष’ आहे.” आयोगाने महामंडळाला १५ हजार रुपये नुकसानभरपाई आणि १,०२० रुपये तक्रार खर्च देण्याचे आदेश दिले. ही रक्कम ४५ दिवसांत न दिल्यास १२ टक्के व्याज आकारले जाईल. हा निकाल ग्रामीण भागातील हजारो प्रवाशांच्या हक्कासाठी ऐतिहासिक ठरला आहे.