प्रभात वृत्तसेवा मंचर – पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातील पारगाव-जारकरवाडी गटात मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अद्याप कुठलीही कल्पना मला देण्यात आली नाही. पक्षाच्या बैठकीला कार्यक्रमाला बोलवले जात नाही. त्यामुळे आता जवळपास मला उमेदवारी मिळणार नाही. हेच चित्र दिसत असून माझ्याकडे एक तर लढावे किंवा राजकारणातून निवृत्त व्हावे. हे दोनच पर्याय शिल्लक असल्याची मनातील खदखद जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांनी व्यक्त केली.मंचर-एकलहरे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे बोलत होते. ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेची उमेदवारी विवेक वळसे पाटील यांना जवळपास निश्चित झाली आहे. पारगाव-जारकरवाडी गटात सर्वसाधारण पुरुष यासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर मी निवडणूक लढण्याची इच्छुक असल्याचे वळसे पाटलांना सांगितले होते. त्यांनीही तुम्ही काम चालू करा. असे सांगितले. ते मात्र अद्यापपर्यंत मला उमेदवारी देण्याबाबत कुठलाही शब्द देण्यात आला नाही. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्याबरोबर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो. वळसे पाटलांवर विश्वास ठेवला; मात्र आता आम्हाला उमेदवारी देण्याबाबत डावलले जात आहे. पक्ष काय निर्णय घेईल हे माहीत नाही. मात्र आता माझ्याकडे एक तर लढावे किंवा राजकारणातून दूर ठेवावे हे दोनच पर्याय शिल्लक आहेत. असेही त्यांनी सांगितले.