प्रभात वृत्तसेवा वडगाव निंबाळकर – बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे (सिद्धपुरी) या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये हे एकमेव दशभूजा दत्तमूर्ती आहे. श्री दत्त जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सोहळ्यास बारामती तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तगण मोठ्या संख्येने दाखल झाले होते. भक्तगणांमध्ये परिसर दुमदुमून गेला होता. बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे 12 व्या शतकातील प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर तसेच परमहंस श्री दत्तानंद सरस्वती महाराज यांची संजीवनी समाधी आहे. नृसिंह सरस्वतीच्या पदकांची स्थापना स्वतः परमहंस श्री दत्तानंद सरस्वती महाराज यांनी केली आहे. दशभूजा भव्य दत्त मंदिर आहे. पुरातन पुष्करणी (बारव) व वराहमूर्ती देखील आहे. श्रीदत्त जयंती सोहळ्यानिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेली असते.महाभिषेक व नित्य पूजा करण्यात येतात.दुपारी लोणी भापकरचे बाल कलाकार तबलावादक अभिमन्यू प्रकाश खराडे व हार्मोनियमवादक वीर प्रकाश कराडे या बंधूंचे गायन व वादन पार पडले. दुपारनंतर ज्येष्ठ नागरिक कला मंच स्वरमंदिर धायरी पुणे यांचे सुगम संगीत पार पाडून उपस्थितांची मने जिंकली. संगीत कार्यक्रमासाठी तबला साथ श्रीकांत एकबोटे व हार्मोनियम साथ मुकुंद दिवाण यांची मिळाली. श्री भैरवनाथ भक्त भजनी मंडळ लोणी भापकर यांचे भजन देखील पार पडले. सायंकाळी 5:45 मिनिटांनी सूर्यास्तावेळी श्री दत्त जन्मोत्सव पार पडला. यावेळी पुष्पवृष्टी करून खिरापत व सुंठवडा वाटण्यात आला व त्यानंतर आरतीचा कार्यक्रम झाला. शुक्रवारी (दि.५) सकाळी नऊ वाजता महारुद्र अभिषेक व दुपारी एक वाजल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे. श्रींची पालखीची श्रीदत्त मंदिरापासून गावात श्री भैरवनाथ मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. शनिवार (दि.6) सुपे येथील शिरसागर बंधू यांच्या वतीने लघुरुद्र अभिषेक तसेच महाप्रसाद आहे. याबाबत श्री दत्त दशभूजा दत्त संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गोलांडे, कार्याध्यक्ष बापूसाहेब गोलांडे, सचिव श्रीकांत भापकर, माजी सरपंच रवींद्र भापकर यांनी माहिती दिली.