प्रभात वृत्तसेवा अकलूज – अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत मोहिते-पाटील गटाने विरोधकांना चारीमुंड्या चित करत घवघवीत विजय मिळवला असून, नगरपरिषदेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा मोहिते-पाटील यांच्या हातात गेल्या आहेत. एकूण 27 पैकी 23 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) व मित्रपक्षांनी अकलूजवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या अकलूजचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भारतीय जनता पार्टी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र विकास सेना अशा विविध पक्षांनी आपली ताकद पणाला लावली होती. नगराध्यक्षपदासाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या रेश्मा आडगळे, भाजपच्या पूजा कोतमिरे, महाराष्ट्र विकास सेनेच्या सुवर्णा साठे, वंचित बहुजन आघाडीच्या उषा कांबळे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दिव्यानी रास्ते रिंगणात होत्या. मात्र रेश्मा आडगळे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत निर्णायक विजय मिळवला, ज्यामुळे मोहिते-पाटील गटाच्या नेतृत्वावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले. नगरसेवक पदासाठी झालेल्या लढतीत शरदचंद्र पवार पक्षाचे तब्बल 22 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना (उबाठा) ला मिळालेल्या 2 जागांवर दोन्ही उमेदवार विजयी झाले. दुसरीकडे, जोरदार प्रचार करूनही भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी अजित पवार गट, वंचित बहुजन आघाडी आणि इतर पक्षांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. या निकालाने अकलूज आणि मोहिते-पाटील हे राजकीय समीकरण आजही मजबूत आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. निवडणूक काळात मोहिते-पाटील यांच्यावर दहशतीचे आरोप झाले होते; मात्र अकलूजमध्ये दहशत नसून विश्वासाचे राजकारण आहे, हे मतदारांनी मतदानातून दाखवून दिले, असे मत नवनिर्वाचित नगराध्यक्षा रेश्मा आडगळे यांनी व्यक्त केले. या घवघवीत यशाबद्दल जयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील, किशोरसिंह माने-पाटील, क्रांतिसिंह मोहिते-पाटील आदी मोहिते-पाटील व माने-पाटील परिवाराने अकलूज पंचक्रोशीतील मतदारांचे शतशः आभार मानले.