प्रभात वृत्तसेवा भोर – भोर- कापूरहोळ रस्त्याचे रखडलेले काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागल्याने भोर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी तुटल्याने रस्त्यावरून पाणी वाहत आहे. वर्षभरात भोर- कापूरहोळ- वाई रस्त्याचे काम सुरू असताना यापूर्वी ३२ वेळा पाइपलाइन फुटली होती. पाइपलाइन फुटण्याची ही ३३ वी वेळ आहे. पाइपलाइन तुटल्याने रस्त्यावर पाणी साचले असून काही ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत होते. यामुळे चारचाकीसह दुचाकीस्वारांना वाहन चालवताना कसरत करावी लागली.भोर- कापूरहोळ रस्त्यावर भोलावडे गावच्या हद्दीत रुंदीकरणाच्या कामाच्या ठिकाणी भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून पाणी गळती झाल्याने रस्त्यावर पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालक व पायी जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भोर- कापूरहोळ रस्त्याच्या दरम्यान भोलावडे गावच्या हद्दीतील रखडलेल्या काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. भोलावडे हद्दीत रुंदीकरणासाठी खोदकाम करताना यापूर्वी १५ नोव्हेंबरला जलवाहिनी फुटली होती. फुटलेली जलवाहिनी नगरपरिषदेकडून दुरुस्त करुन त्याच ठिकाणी गाडली. याच ठिकाणी शनिवार (दि.६) संध्याकाळपासून जलवाहिनीची गळती सुरु झाली असून रविवारी सायंकाळपर्यंत दुरुस्ती केली नव्हती. त्यामुळे गळतीमुळे येणारा पाण्याचा प्रवाह रस्त्यावरुन वाहत होता.पेट्रोल पंपाजवळ रुंदीकरणासाठी खोदलेला खड्डाही पाण्याने भरुन पाणी राजा रघुनाथराव विद्यालयाकडे रस्त्याने पाणी वाहत असून पसुरे व महुडेकडील वळणाच्या ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. रस्त्यावर जागोजागी पाणी साचले असताना दुचाकी व पायी जाणाऱ्या नागरिकांना पाणी अंगावर उडत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना कसरत करावी लागत असून वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी झाली. भोर शहराला पाणीपुरवठा करणारी नगरपरिषदेची जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले तर हजारो लिटर पाणी वाया गेले. “रस्त्याचे काम करताना बऱ्याच वेळा पाइपलाइन जेसीबीमुळे तुटत आहे. ठेकेदाराला वेळोवेळी काळजीपूर्वक काम करण्याचे सांगूनही काम करताना काळजी घेतली जात नाही. पाइपलाइन तुटल्याने रस्त्यावर पाणी वाहत आहे. यासाठी तात्काळ काम करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे.” – प्रवीण जगदाळे, सरपंच, भोलावडे.