जांबुत – शिरूर तालुक्यातील काठापुर खुर्द परिसरातील शेतकरी संतोष दशरथ वाव्हळ यांचे शेतात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात 7 वर्षीय मादी संवर्गातील बिबट्याला सोमवारी (दि. १५) रोजी पहाटे वनविभागाकडून जेरबंद करण्यात आले. मागील दोन महिन्यापासून या भागात बिबट्याचे वास्तव्य नेहमीच स्थानिकांच्या निदर्शनास येत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काठापुर खुर्द येथे सरपंच सिमा थिटे आणि विकास सोसायटीचे अध्यक्ष अशोक दाते यांनी वारंवार या भागात पिंजरे लावून बिबट्याना जेरबंद करण्याची मागणी केली होती. पिंपरखेड येथील बिबट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अलर्ट झालेल्या वनविभागाकडून मागील घटनांचे गांभीर्य लक्षात घेता या परिसरात पिंजरे लावण्यात आले होते. गेली अनेक दिवसांपासून बिबट्याच्या भीतीने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला होता तसेच नागरिक, शेतमजूर हे भीतीच्या सावटाखाली जीवन जगत असुन अद्यापही या भागातून बिबट्याची संख्या कमी झाली नसल्याचे दिसून येत आहे. मात्र वनविभागाने बेट भागातील पिंपरखेड, जांबुत, फाकटे, काठापूर खुर्द आणि परिसरात पिंजरे लावून वास्तव्य करणारे बिबटे जेरबंद करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर उर्फ नितिन पिंगळे यांनी केली आहे. ‘वनतारा’ला बिबटे जाणार कधी? शिरूर तालुक्यातील जनतेचा सवाल पिंपरखेड (ता. शिरूर ) येथे पाच वर्षीय चिमुरडी शिवन्या बोंबे, शालेय विद्यार्थी रोहन बोंबे आणि जांबुत येथील महिला भागुबाई जाधव यांच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी केलेल्या विविध आंदोलनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पुढील पंधरा दिवसांत तात्काळ माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात स्थानबद्ध केलेले वीस बिबटे गुजरात राज्यातील वनतारा येथे पाठविण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले असले तरी मात्र याबाबत होणारी कार्यवाही अद्यापही प्रशासकीय बाबींच्या लालफितीत अडकलेली दिसून येत आहे. मागील काही वर्षापूर्वी बिबट ठेवण्याची माणिडोह येथील क्षमता पूर्ण झालेली असताना देखील दोन महिन्यात जेरबंद केलेले 25 बिबटे अद्यापही माणिकडोह येथे कसे ठेवण्यात आले याबाबत जनतेकडून विचारणा करण्यात येत आहे.