प्रभात वृत्तसेवा अवसरी – अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) परिसरातील कौलीमळा येथे पावणे दोन प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर नर जातीचा सुमारे दीड ते दोन वर्ष वयाचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. बिबट्या जेरबंद झाला असल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.कौली मळा येथील रवींद्र वाळके यांच्या घरासमोरील पोर्चमध्ये १८ नोव्हेंबर रोजी तीन बिबटे आलेले सीसीटीव्हीमध्ये आढळले होते. त्या नंतर वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रदीप कासारे आणि वनरक्षक शिवाजी ढोले यांच्या माध्यमातून पिंजरा लावण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा सहा डिसेंबर रोजी पुन्हा एक बिबट्या रवींद्र वाळके यांच्या घरासमोर आल्याचे आढळले होते. त्या वेळी घराच्या उत्तरेस पंचवीस फूट अंतरावर असणाऱ्या पिंजऱ्याकडे ढुंकून ही पाहिले नव्हते. त्यानंतर तसाच तो बिबट्या घराच्या पूर्व दिशेला असलेल्या रस्त्याने गेला. त्या नंतर सात डिसेंबर रोजी म्हसोबा देवाच्या शेजारी जयसिंग बळवंत भोर यांच्या शेतात पिंजरा हलवण्यात आला. त्यात गेले सव्वा महिने त्यात बिबट्या अडकला नव्हता. तीन दिवसांपासून अशोक वाळके यांच्या शेतात धनगरांचा वाडा होता. त्यामुळे बिबट्या आला असावा आणि भक्ष्याच्या शोधात पिंजऱ्यात अडकला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी सातच्या सुमारास जोरजोरात आवाज येत असल्याचे धनगरांच्या लक्षात आले. त्यांनी पाहिले असता त्यात बिबट्या अडकल्याच दिसून आले. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना माहिती दिली. अजून या परिसरात एक मोठा आणि आणि एक छोटा बिबट्या आहे. त्यालाही जेरबंद करावे, अशी ग्रामपंचायत सदस्य जगदीश अभंग यांनी केली आहे. सावज शोधणारा स्वत:च अडकला कौलीमळा येथे रवींद्र वाळके यांच्या घरी दोन महिन्यात तीन वेळा बिबट्या आढळला. बुधवारी, दि. १४ रोजी पहाटे एक वाजून चाळीस मिनिटांनंतर पुन्हा एकदा बिबट्या येऊन गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. वाळके यांच्या घरी १८ नोव्हेंबर रोजी तीन बिबटे आले होते. त्या नंतर सहा डिसेंबर रोजी पहाटे साडे चार वाजता एक बिबट्या घरच्या पश्चिमेकडून आला होता. बुधवारी पहाटे पुन्हा एकदा एक वाजून चाळीस मिनिटाने बिबट्या जुन्या घराच्या अंगणातून नवीन बंगल्याच्या आवारात येऊन पश्चिमेला सुमारे वीस मिनिटे ठाण मांडून बसला होता. तो आला, थांबला पाहिले आणि ठाण मांडून बसला. स्वतःसाठी सावज शोधण्याच्या नादात स्वत:च पिंजऱ्यात अडकला.