प्रभात वृत्तसेवा आळंदी – येथील वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारी श्रीरामकृष्ण आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची यांच्या वतीने राजस्थानमधील सोजत (जिल्हा पाली) येथे ज्ञानोबा-तुकोबांचा नामघोष करण्यात आला. श्रीसंत नामदेवराय यांनी वारकरी संप्रदायाची पताका पंजाबपर्यंत नेली, तोच वारसा पुढे चालवत ही संस्था भारतातील विविध राज्यांत संप्रदायाचा प्रचार करत आहे. परमपूज्य श्रीस्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या सोहळ्यात महाराष्ट्राची वारकरी परंपरा राजस्थानमध्ये अनुभवायला मिळत आहे.या धार्मिक सोहळ्यामध्ये जगद्गुरू शंकराचार्य कोचीपुराण, परमपूज्य स्वामी गुरू शरणानंदजी महाराज, स्वामी अवधेशानंद गिरीजी (हरिद्वार), योगगुरू स्वामी रामदेवजी महाराज, मंडलेश्वर स्वामी महेश आनंदपुरीजी महाराज आणि स्वामी आनंद सरस्वतीजी यांसारख्या देशातील नामावंत संत-महंतांची उपस्थिती लाभली आहे. आळंदीतील श्रीरामकृष्ण संस्थेचे ३० विद्यार्थी, ह.भ.प. रामचंद्र महाराज सारंग, ह.भ.प. रवी महाराज कुमकर, ह.भ.प. वैभव महाराज गलधर, सचिव सचिन महाराज शिंदे आणि सुशीला शिंदे यांच्या उपस्थितीत काकडा, हरिपाठ व भजनाचे कार्यक्रम पार पडत आहेत.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ११,१११ महिलांनी कलश डोक्यावर घेऊन भव्य दिंडी काढली होती. यामध्ये उंट, घोडे आणि वारकरी परंपरेची दिंडी आकर्षणाचे केंद्र ठरली. दररोज पहाटे काकड आरती, होम हवन, संत पूजन आणि दुपारी श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तीमय वातावरणाचा अनुभव राजस्थानमधील भाविकांसह विविध राज्यांचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री घेत आहेत. ज्ञानेश्वरी व तुकाराम गाथेचा विचार संपूर्ण देशभर पोहोचवण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सचिव सचिन शिंदे यांनी सांगितले. गेली २५ वर्षे आळंदीत कार्यरत असलेली ही संस्था अनाथांचा सांभाळ व गोरगरिबांना मदत करण्याचे कार्यही सातत्याने करत आहे.