प्रभात वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे – तळेगाव ते न्हावरे या राष्ट्रीय महामार्ग ‘५४८ डी’च्या सुरू असलेल्या रुंदीकरण कामामुळे ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. रस्ता विकास करताना सार्वजनिक सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी या माध्यमातून केली आहे. तळेगाव ढमढेरे गावातून होणाऱ्या या रुंदीकरण मार्गालगत जिल्हा परिषद शाळा, विविध विद्यालये, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, मुख्य बाजारपेठ आणि सार्वजनिक मैदान आहे. रस्ता रुंदीकरण झाल्यास या भागातील दैनंदिन वर्दळीवर मोठा परिणाम होऊन विद्यार्थी आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या समस्या लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी आणि गावकऱ्यांच्या प्रश्नांवर योग्य उपाययोजना सुचवाव्यात, अशी सूचना डॉ. कोल्हे यांनी केली आहे.रस्ता विकास आवश्यक असला तरी, तो करताना गावातील शैक्षणिक व आरोग्य सुविधांवर विपरीत परिणाम होणार नाही; याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे मत खासदारांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सामंजस्याने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा आता ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.