प्रभात वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे – राष्ट्रीय महामार्ग ‘५४८डी’च्या रुंदीकरण कामात तळेगाव ढमढेरे येथील गोविंद बाबुराव कऱ्हेकर यांचे छोटेसे सलून काढले गेल्याने एका कष्टकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हे सलून कऱ्हेकर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा एकमेव आधार आणि मुलांच्या भविष्यातील स्वप्नांचा पाया होता. मात्र, पुनर्वसनाची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने सध्या गोविंद कऱ्हेकर जुन्या शासकीय गोडाऊनच्या कट्ट्यावर उघड्यावर बसून दाढी-कटिंगचा व्यवसाय करत आहेत. कऱ्हेकर यांची परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही त्यांनी प्रामाणिक कष्टाने आपला संसार चालवला होता. त्यांची मुलगी सध्या पुण्यात अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेत आहे, तर मुलगा गावात माध्यमिक शिक्षण घेत आहे. मुलांनी शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी ते बचत करत होते. मात्र, अचानक दुकान हटवल्यामुळे उत्पन्न घटले असून मुलीच्या शिक्षणाचा खर्च आणि घरखर्च कसा भागवायचा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. ‘५४८डी’ रस्त्याच्या विकासकामात गावातील अनेक छोट्या व्यापाऱ्यांची दुकाने गेली असून अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. विकास आवश्यक असला तरी तो कष्टकरी आणि छोट्या व्यावसायिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नसावा, अशी तीव्र भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर तळेगाव ढमढेरे येथील नागरिक पर्यायी रस्ता, बायपास किंवा उड्डाणपुलाची मागणी करत आहेत. रस्ते रुंद करताना माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार असेल तर असा विकास कोणाच्या भल्यासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.