प्रभात वृत्तसेवा पुणे – जेजुरीच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ द्या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.जेजुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचारार्थ आयोजित सभेत जेजुरीत बोलताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राचे लोकदैवत मल्हार मार्तंड नगरीचा विकास करण्यासाठी स्वच्छ सुंदर हरीत जेजुरी शहरातील सोयीसुविधा सुधारण्यासाठी एक व्हिजन असणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी जयदीप बारभाई यांना आणि नगरसेवक पदासाठी प्रत्येक 10 प्रभागातील घड्याळाच्या चिन्हावर उभे राहिलेल्या 20 उमेदवारांना निवडून द्यावे.जेजूरी शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटीबद्ध असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. दिलीप बारभाई यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल, असे सांगितले. ठळक घटकांना प्राधान्य जेजुरीच्या विकासासाठी ठळक घटक १) स्वच्छ आणि दररोज पाणीपुरवठा २) नागरी स्वच्छता आणि शौचालय निर्मिती ३) जेजुरी शहराची हद्दवाढ ४) शहरातील पार्किंग भाविकांच्या सोयीसाठी ५)शहर आणि परिसरातील उपनगरात चांगले रस्ते निर्माण करणे. ६) जेजुरी नगरपरिषदेच्या उत्पन्न वाढविण्यावर भर देणे. ७) जेजुरी शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावणे (बायोमायनिंग प्रकल्प) ८)कडेपठार मंदिरावर जाण्यासाठी रोपवे ९) शहरात उद्यान विकसित करणे, आदी विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल. यावेळी अजित पवार पुढे म्हणाले की, जेजुरी शहरात अठरापगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. नगरपालिकेसाठी अनुभवी आणि तरूणांना संधी दिली आहे. जेजूरी नगरपरिषदेसाठी जयदिप बारभाई, प्रचारप्रमुख संदीप जगताप, संतोष खोमणे, रमेश लेंडे, भारत शेरे, गणेश निकुडे, रोहिदास कुंभार, रमेश बयास यांच्या समन्वयातून नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल उभे राहिले आहे. जेजुरीच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषदेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे द्या. जेजुरीत येऊन कोणी आरे केले तर आम्हीही कारे करणार.