प्रभात वृत्तसेवा राहु – दौंड तालुक्यात पाच आणि शिरुर तालुक्यातील एक, असे सहा साखर कारखाने दौंड परिसरात आहे. दौंडला ऊस उत्पादनाचे आगर म्हणून ओळखले जात असले तरी दौंडमधील कारखान्याने आजपर्यंत बाजारभाव जाहीर केलेला नाही. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सर्वच कारखान्यांवर नाराज आहे. परिणामी दौंड तालुक्यात उसाचे क्षेत्र फार नाही. दौंड हे जरी ऊस उत्पादनाचे आगर असले तरी ऊस दराबाबत दौंडकर हे कायमच मागे असतात. आज गाळपयोग्य उसाचे क्षेत्र हे कमी ऊपलब्ध आहे. परंतु अजूनही दौंडमधील कोणत्या ही कारखान्याने बाजारभाव जाहीर केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेजारील बारामती, इंदापूर असेल किंवा आंबेगाव असेल या ठिकाणच्या सहकारी कारखान्यांनी काही प्रमाणात का होइना बाजारभाव जाहीर केले आहेत. परंतु दौंडमध्ये तसे होताना दिसत नाही. दौंडमध्ये नाही म्हणले तरी चांगल्या प्रकारे उसाचा तुटवडा भासू शकतो. व त्यामुळे स्पर्धा निर्माण झाली आहे. परंतु या स्पर्धेचा शेतकऱ्यांना कधीही फायदा होताना दिसत नाही. यंदा दौंडमध्ये दौंड शुगर, भिमा पाटस,श्रीनाथ म्हस्कोबा, यवत येथील ओ.एस.जी. ग्रीन एनर्जी, मिरवडी येथील कुंजीर बायो एनर्जी व शिरूरमधील व्यंकटेश कृपा, हे सहा कारखाने चालू चालू आहेत. यापैकी कोणीच बाजारभावाची कोंडी फोडलेली नाही.यंदा दौंड शुगर भिमा पाटस हे कारखाने मोठ्या प्रमाणात गाळप करू शकतो. तर श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याने देखील आपली क्षमता वाढविली आहे. तर व्यंकटेश कृपा देखील बेट परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करू शकतो.त्या मुळे या वर्षी मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु उसाची उपलब्धता खूप कमी आहे. बाजार भावाच्या नियमानुसार मागणीपेक्षा पुरवठा कमी असेल तर त्या मालाची किंमत ही आपोआप वाढत असते.परंतु दौंडमध्ये हा नियम अपवाद असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी संघटनांचे अस्तित्व दिसेना… कोल्हापूर,सांगली, सातारा या जिल्ह्यात ज्या प्रमाणे शेतकरी संघटना आक्रमकपणे काम करतात. त्या मानाने पुणे जिल्ह्यात शेतकरी संघटना या आक्रमक होताना दिसून येत नाही. फक्त कारखानदारांच्या भेटी घेऊन प्रश्न सुटणार नाही तर गाळप बंद पाडून कोंडी केली तरच कोंडी फुटणार आहे. हे शेतकरी संघटनांनी लक्षात घेतले पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. त्या मुळे कारखानदार शिरजोर झाले आहेत, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. दौंडचा शेतकरी कधी एकत्र येणार? आतापर्यंतच्या इतिहासात ऊस दराच्या बाबतीत दौंडकरांना कायमच कमीपणा घ्यावा लागला आहे. याला कारण हे कारखानदार नसून शेतकरी आहे. असे अनेक जणांचे म्हणणे आहे. दौंडमधील शेतकरी ठराविक गटा तटात विभागला आहे. त्यामुळे राजकारणासाठी गटात एकत्र येतो,तसा आपल्या प्रपंचासाठी म्हणजेच उसाच्या बाबतीत कधी एकत्र येणार हा एक न उलगडणारा प्रश्न आहे. कारण इतर तालुक्याच्या बाबतीत विचार केला तर दौंड तालुक्यातील सभासदा पेक्षा इतर कारखान्याचे सभासद हे आपल्याअधिकाराप्रती मोठ्या प्रमाणात जागृत आहे व त्यामुळे त्यांना दौंडपेक्षा कायमच बाजारभाव जास्त मिळत आहे.