प्रभात वृत्तसेवा मंचर – कोकण दर्शन सहल करून संगमनेर या ठिकाणी घरी जात असताना पुणे-नाशिक महामार्गावर एकलहरे (ता.आंबेगाव) गावच्या हद्दीत दोन एसटी बसचा गुरुवार, दि.११ रोजी अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात एसटी बसमधील २० विद्यार्थी आणि ५ शिक्षक किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की संगमनेर येथील भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री जुनियर कॉलेज या विद्यालयाचे विद्यार्थी व काही शिक्षक एम एच १४ एम एच १०७९ व एम एच १४ एम एच ०९३१ या दोन बसद्वारे कोकण सहलीसाठी गेले होते. सहलीवरून घरी जात असताना गुरुवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास एकलहरे बायपास जवळ गतिरोधक असताना बस चालक यांनी ब्रेक दाबला असता मागील बस पुढील बसला जाऊन धडकली. या अपघातात दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बसमधील बेचाळीस विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थी आणि ५ शिक्षक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेची माहिती कळतात मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. जखमी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे-श्वेता अभंग (वय १७),ईश्वरी करपे (वय १६),वर्षा राठोड (वय १८),अजय पवार (वय १८),प्रणव परदेशी (वय १६),अनुष्का कोरडे (वय १६),सार्थक अरगडे (वय १७),गणराज बांगर (वय १६),पूजा मुसळे (वय १६),दिव्या अरगडे (वय १६),भक्ती चितळे (वय १६),श्वेता सूर्यवंशी (वय १६),ईश्वरी कोकणे (वय १६),प्रीती खरात (वय १६),पुनम शिंदे (वय १६),प्रांशू तिवारी (वय १६),राहुल तळपे (वय १६),समाधान कांदळकर(वय १६),संजना कचेरीया (वय १७),अंकिता दिघे (वय १७) शिक्षक : भारती दळवी (वय ५७), रूपाली सुपेकर(वय ४९), गणेश गुंजाळ (वय ५३), संतोष थोरात (वय ४३), गणपत जोंधळे (वय ५४) याप्रमाणे आहे. भाजपचे नेते अरविंद वळसे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते सुहास बाणखेले यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.अपघातस्थळी मंचर एसटी आगार प्रमुख वंसतराव अरगडे आणि वाहतूक नियंत्रक मोहम्मद सलील सय्यद यांनी भेट देवून जखमींना प्राथमिक स्वरुपात १ हजार रुपये मदत केली आहे.मंचर पोलिसांनी भेट देवून पाहणी केली.