प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ७१.१४ टक्के मतदान नोंदवले. दुपारी संथ गतीने सुरू झालेली मतदान प्रक्रिया संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत जोर धरत बहुतेक प्रभागांत समाधानकारक टक्केवारी नोंदली गेली. शिरूर नगरपरीषदेचे एकूण मतदार ३२९९३ असून त्यापैकी २३४७२ इतके मतदान झाले आहे. दिवसभर शांततेत मतदान पार पडले. मतदान केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. मतदानाच्या टक्केवारीवरून नागरिकांमध्ये निवडणुकीबाबतची जागरूकता अधोरेखित झाली आहे. आता सर्वांचे लक्ष दि. २१ डिसेंबरवर लांबलेल्या निकालाकडे लागले असून, शिरूर नगरपरिषद कोणाच्या हाती जाणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदारांचा चांगला प्रतिसाद… एकूण १६ हजार ६९२ महिला मतदारांपैकी ११ हजार ७१० महिलांनी मतदान करून मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला, तर १६ हजार ३०० पुरुषांपैकी ११ हजार ७६२ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. तृतीयपंथी मतदार एक असून त्यांनीही मतदान केले.