जांबूत – भैरवनाथ विद्यालय करडे येथे पार पडलेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पिंपरखेड (ता.शिरूर) येथील श्रीदत्त विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त करत बाजी मारली आहे. त्यानुसार आता श्रीदत्त विद्यालयाची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व शिरूर पंचायत समिती तथा गणित व विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. श्रीदत्त विद्यालयातील इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी कुमारी स्वराली नवनाथ दाभाडे व ईश्वरी संजय पडवळ यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञान या विषयांतर्गत वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर हा प्रकल्प केला होता. त्यात तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक आल्याने त्यांची जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. दरम्यान, या प्रकल्पासाठी त्यांना प्राध्यापक रमेश गावशेते, नितीन कोकाटे, प्रियांका दाभाडे , प्रियांका येवले, सुप्रिया वरे यांचे मार्गदर्शन मिळाले होते. तर मोठ्या गटात प्रश्नमंजुषा स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देखील प्रथम क्रमांक प्राप्त करून विद्यालयाला नावलौकिक मिळवून दिला आहे. यामध्ये इयत्ता अकरावी मधील कुमारी मयुरी शरद बोंबे, वैष्णवी योगेश भालेकर व इयत्ता नववी मधील समीक्षा मोतीराम उंडे यांचा समावेश आहे. यासाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राध्यापक संतोष पानमंद, नारायण पाबळे , विनोद बोऱ्हाडे , उमा बोंबे, निसार शेख आदींनी मार्गदर्शन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खुशाल बोंबे , सरपंच राजेंद्र दाभाडे , उपसरपंच विकास वरे , सोसायटीचे अध्यक्ष किरण ढोमे , तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप बोंबे, पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे यांचे प्राचार्य रामदास मगर यांनी अभिनंदन केले.