प्रभात वृत्तसेवा शिरूर – तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला असून, पहाटे आणि रात्रीच्या वेळी प्रचंड गारठा जाणवत आहे. किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने नागरिकांना वाढत्या थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी रात्री आणि पहाटे शेकोट्या पेटविल्या जात असून, गावोगावी शेकोटीभोवती नागरिक गोळा होताना दिसत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात पहाटेच्या वेळी दाट धुके आणि गार वाऱ्यामुळे वातावरण अधिक थंड बनले आहे. शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकरी व मजुरांनी स्वेटर, मफलर आणि टोपी यांसारख्या उबदार कपड्यांचा वापर वाढवला आहे. अनेक ठिकाणी चहाच्या टपऱ्या, हॉटेल्स, वस्त्या आणि बसस्थानक परिसरात लोक शेकोट्या पेटवून उब घेताना दिसत आहेत. थंडीचा परिणाम दैनंदिन कामकाजावरही होत असून, वाढत्या गारठ्यामुळे ऊसतोड कामगार आणि बांधकाम मजुरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.थंडीमुळे सर्दी, खोकला आणि तापासारख्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झाल्याचे चित्र असून, पहाटेच्या प्रवासावरही मर्यादा आल्या आहेत. पुढील काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून, नागरिकांनी गरम पाणी पिणे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.