प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – शिरूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी कुऱ्हाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना हे महत्त्वाचे पद मिळाले आहे.शिवाजी कुऱ्हाडे यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकार मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या हस्ते शिवाजी कुऱ्हाडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.या निवडीनंतर बोलताना शिवाजी कुऱ्हाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी आणि ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणार असल्याचे सांगितले.