प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आणि स्वच्छता – आरोग्य समितीचे माजी सभापती विठ्ठल पवार यांनी शुक्रवारी (दि. २१) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करून शिरूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. २०१६ च्या निवडणुकीत गुजर मळा प्रभागातून प्रभावी विजय मिळवलेल्या पवार यांनी गेली पाच वर्षे नगरपरिषदेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. माजी आमदार स्वर्गीय बाबूराव पाचर्णे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे विठ्ठल पवार यांच्या प्रवेशामुळे शिरूर शहरात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. पाचर्णे यांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी अण्णापूर, रामलिंग परिसरासह शहरातील अनेक समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या कार्यकाळात शिरूर नगरपरिषदेला मिळालेला स्वच्छता पुरस्कार हा त्यांच्या कार्यकुशलतेचा ठसा मानला जातो. दरम्यान, स्वर्गीय बाबूराव पाचर्णे यांचे निष्ठावंत समर्थक आणि स्टेट बँक कॉलनीतील युवक कार्यकर्ते सागर सातारकर यांनीदेखील अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पाचर्णे समर्थकांची ताकद आता राष्ट्रवादीकडे वळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विठ्ठल पवार आणि सागर सातारकर यांच्या प्रवेशामुळे शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नवी ऊर्जा मिळणार असून नगरपरिषद निवडणुकीत या घडामोडी निर्णायक ठरू शकतात.