प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील हॉटेल मैफिल बार लॉजिंग येथे विक्रम कणसे (वय ३६, रा. बीजवडी, ता. इंदापूर) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लॉजच्या रुममध्ये तो जमिनीवर बेशुद्धावस्थेत आढळला होता.विक्रम कणसे हा सायंकाळच्या सुमारास लॉजमध्ये आला होता आणि त्याने ओळखपत्र देऊन रूम बुक केली होती. मात्र, त्याने पेमेंट केले नव्हते. त्यामुळे लॉजचे सुपरवायझर संजय जेना यांनी विक्रमला फोन केला. त्याने कॉल घेतला नसल्याने संजय जेना पेमेंट घेण्यासाठी विक्रमच्या रुमकडे गेले असता, त्यांना विक्रम जमिनीवर बेशुद्ध पडलेला दिसून आला. त्यानंतर शेजारील डॉक्टरांनी तपासणी केली असता, विक्रम कणसे याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याबाबत हर्षद संजय काळे (रा. काळे ओढा, वाघोली, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलिसात खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार श्रावण गुपचे करत आहेत.